अकोला दिव्य न्युज ब्युरो : मागील दहा वर्षात सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर महाराष्ट्रवासीयांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. २०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राची पाणबुडी गुजरातमध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला तर त्यातील काही निधी वितरितही झाला होता. मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. मागील दहा वर्षात पर्यटन वाढीसाठी नव्याने एकही संकल्पना राबविण्यात आली नाही. किंवा कोणतेही नवे पर्यटन आकर्षण निर्माण केले नाही. सरकारे बदलत असली तरीही जिल्ह्यातील नेतृत्वांनी पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला नाही.
नेमकी अडचण कुठे आली
पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव देश पातळीवर वर गेले असते. परिणामी सिंधुदुर्गमध्ये उच्च दर्जाचे पर्यटन प्रस्थापित झाले असते. जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागले असते. या प्रकल्पाची संकल्पना, अहवाल आणि निधीची तरतूदही करण्यात आली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या, याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.