अकोल्यात चक्क बनावट गुटख्याचे उत्पादन ! गौरव शर्मा फरार : मकोकाची कारवाई ; राजकीय पाठबळ

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी गुटखा प्रतिबंधीत असताना, अकोला एमआयडीसीत चक्क प्रतिबंधित गुटख्याचे उत्पादन करणाऱ्या एका गोडाऊनवर आज गुरूवार १६ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने अकोला पोलिसांना सोबत घेऊन संयुक्त धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईची खबर होताच गौरव शर्मा व गोडाऊन मालक फरार झाला आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

या कारवाई दरम्यान पकडलेले आरोपी तसेच फरार गौरव शर्मा आणि गोडाऊन मालक यांच्याविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या संघटित गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन करण्यास त्यांच्यावर थेट ‘मोक्का’ लावण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची अधिकृत माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी अकोला दिव्य न्यूज नेटवर्कला दिली.

अकोला एमआयडीसी पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या कारखान्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल, वाह, पान बहार, आणि रिच टेन या नामांकित ब्रँडच्या नावाखाली बनावट गुटखा उत्पादन करणाऱ्या या रॅकेटचा सुत्रधार गौरव शर्मा आणि त्याच्या वडिलांचे राजकीय लागेबांधे असल्याने अकोला पोलिस विभागासोबतच व अन्न व औषध प्रशासनाच्या आशिर्वादाने हा कारखाना राजरोसपणे सुरू असल्याची शहरात चर्चा आहे.

अन्न व औषधी प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने या कारखान्यावर पाळत ठेवून आज अकोला एमआयडीसी पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली. या कारवाईत गुटखा, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. आज पहाटे केलेल्या कारवाईचे नेतृत्व अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी केले. महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि सुगंधी तंबाखूच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. या कारवाईनंतर अकोला आणि इतर जिल्ह्यांतील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here