Wednesday, June 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला Z.P सीईओपदी अनय नितीन नावंदर ! UPSC परीक्षेत देशातून 32 वा...

अकोला Z.P सीईओपदी अनय नितीन नावंदर ! UPSC परीक्षेत देशातून 32 वा क्रमांक

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर महाराष्ट्र केडरचे २०२२ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी अनय नितीन नावंदर (Anay Nitin Navandar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे सोलापूरचे रहिवासी असलेले अनय नावंदर सध्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे प्रकल्प अधिकारी, ITDP, तळोदा तथा तळोदा उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भंडारा येथेही सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. एक अत्यंत यशस्वी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले नावंदर यांनी २०२१ च्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत अखिल भारतातून ३२ वा क्रमांक पटकावला होता.

मुळचे सोलापूरच रहिवासी आणि सध्या पुणे येथे स्थायी झालेले चार्टर्ड अकाऊंटंड नितीन नावंदर यांचा अनय हा मुलगा असून अनयचे पहिली ते सहावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरातील सेंट जोसेफ प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण माजलगाव येथे झाले. पुन्हा ११,१२ वीचे शिक्षण सोलापुरातील ए.डी.जोशी महाविद्यालयातून पूर्ण केले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) येथून फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech पदवी पूर्ण केली. त्यानंतर पहिले 6 महिने खासगी कंपनीत नोकरी केली. खासगी कंपनीत नोकरी करण्यापेक्षा प्रशासकीय सेवेतून लोकसेवा करण्याच्या हेतूने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.

पुण्यात घरी बसून युपीएससीचा अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत गेल्यानंतरही अनयला अपयश आले होते. पण, अपयश ही यशाची पहिली पायरी समजून त्यांनी पुन्हा जोमाने अभ्यास सुरु ठेवला. दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळाले आणि देशात ३२ व्या क्रमांकाने अनय नावंदर उत्तीर्ण झाले.

आई न्यायाधीश असल्याने बदलीमुळे सातत्याने शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये बदलावी लागली.तरीदेखील, अभ्यास, जिद्द, चिकाटीतून त्यांनी हे यश संपादित केले. कौटुंबिक परिस्थिती चांगली असल्याने अनेकजण युपीएससी, एमपीएससी करताना मुंबई, पुणे, दिल्ली येथे ट्यूशन लावतात. त्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. पण, अनयने UPSC किंवा MPSC च्या तयारीसाठी मूलभूत (Basic) पुस्तकांच्या वाचनावर भर दिला आहे. त्यांच्या मते, तयारी करताना अभ्यासक्रमावर (Syllabus) मजबूत पकड असणे, दर्जेदार संदर्भ पुस्तके वाचणे आणि मॉक टेस्ट सिरीज (Test Series) च्या माध्यमातून स्वतःचे मूल्यमापन करणे खूप गरजेचे आहे. अनय नावंदर यांना अभ्यासाव्यतिरिक्त तबला वादनाची विशेष आवड आहे. 


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!