अकोला पारस औष्णिक प्रकल्पात भीषण स्फोट ! 2 कंत्राटी कामगार गंभीररित्या भाजले ; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

0

अकोला दिव्य न्यूज : पारस औष्णिक वीज प्रकल्पांमधील युनिट क्रमांक ४ मधील ‘कोल मिल’मध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे दोन कंत्राटी कामगार गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेषतः धोकादायक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा मिळते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.या घटनेनंतर वीज प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामधील युनिट ४ मध्ये नियमित काम सुरू असताना कोल मिलमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. बिघाडामुळे मिलमध्ये जोरदार ब्लास्ट होऊन ती ‘बॅक’ मारल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली. स्फोटानंतर प्रचंड गरम राख व कोळशाची पेटती भुकटी थेट कामगारांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत पारस येथील शेख याकूब शेख रऊफ (वय ४०) आणि उरळ येथील कांचन डिगोळे (वय ४०) हे दोघे गंभीररीत्या भाजले गेले. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही कामगार घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना बाहेर काढून अकोल्यातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेनंतर प्रकल्पातील कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता आणि निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. विशेषतः धोकादायक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा मिळते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Oplus_131072

अपघाताची माहिती मिळताच ‘संघर्ष कंत्राटी कामगार समिती’चे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. समितीचे अध्यक्ष मनोहर अवचार, महेश तायडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर संताप व्यक्त करत सेफ्टी ऑफिसरला कडक शब्दांत जाब विचारला. जखमी कामगारांची गेट एन्ट्री आणि अपघात अहवाल तातडीने नोंदवावा, तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च प्रशासनाने किंवा संबंधित कंत्राटदाराने उचलावा, अशी मागणी समितीने केली. वाढत्या दबावामुळे प्रशासनालाही तत्काळ हालचाल करावी लागली.

दरम्यान, ‘राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा’चे अध्यक्ष जयसिंग गायकवाड आणि उपाध्यक्ष शेख आसिफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दोषी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here