अकोल्यात प्रेमविवाहाचा धक्कादायक अंत ! मुलीच्या मामाकडून तरुणाची हत्या

0

अकोला दिव्य न्यूज : प्रेमविवाह केल्याचा वादातून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून तरुणाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात घडली. याप्रकरणी फरार आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या आहेत. प्रेमविवाहाचा धक्कादायक अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत राहुल कालू सारसर याने आरोपीच्या भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून शहरातील अलंकार मार्केटमध्ये १५ मे रोजी आरोपींनी पाईप व तीक्ष्ण हत्यारांनी हत्या केली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता विविध पथके तयार करून तपासासाठी रवाना केले. दरम्यान, फरार होणाच्या तयारीत असलेला मुख्य आरोपी बादशहा सरू पारोचे (३५, रा. वरणगाव ता. भुसावळ जि. जळगाव) याला ताब्यात घेत रामदासपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेतली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथक भुसावळकडे रवाना झाले. जळगांव-भुसावळ महामार्गावर सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी संतोष रामचरण पारोचे (२४, रा. विजय नगर, तारफैल, अकोला), गौरव राहुल करोसिया (१८), हरीश उर्फ हर्शद राहुल करोसिया (२०, दोघे रा. डॉ. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here