अकोलेकरांच्या जीवाशी खेळत आहे मनपा प्रशासन ! गोकर्णा पार्कच्या महिलांचा टाहो

0

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरवासीयांना अगदी आवश्यक अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या अकोला महापालिका प्रशासनाने आता लोकांच्या चक्क जीवीताशी खेळणं सुरू केले की काय ? असा संतप्त सवाल महिला करीत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला गेला होता. मात्र आयुक्तांनी मौन बाळगले तर पाणीपुरवठा विभागाशी संबंधितांनी थातुरमातुर उत्तर देऊन बोळवण केली.

अकोला दिव्य छायाचित्र

शहरातील विविध भागातील नळधारकांना आठवड्यातून कधीमधी अर्धा तास, एक तास पाणी पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी खरंच पिण्यासाठी योग्य आहे का? नागरिकांकडून पाणी चाचणीचे पैसे घेतले जातात. मग कधी गढूळ, कधी पिवळसर तर, कधी दुर्गंधीयुक्त आणि कधी शेवाळयुक्त असे विविध प्रकारचे पाणी नळातून कसं ? नळधारकांकडून घेतलेले पैसे राज्य शासनाला देऊन शासकीय यंत्रणेकडून पाणी चाचणी केली जाते, असं ठेवणीतलं उत्तर आमसभेत संबंधितांनी दिले. आता या उत्तरावर नगरसेवकही निरूत्तर होतात. तेव्हा सामान्य लोकांनी आपल्या जीवीताची सुरक्षा व पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता कोणाकडे मागायची !

अकोला महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील गोकर्णा पार्क या रहिवासी वसाहतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.महापालिका प्रशासनाने आठवड्यातून २ तास किंवा अडीच तास पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.पण आठवड्यातून एक दिवस नळातून पाणी येते. ते देखील कधी १ तास तर कधी अर्धा तासच पाणी पुरवठा केला जातो आणि वीजपुरवठा खंडित असला की वेळ निघून जाते. आजपर्यंत कधीही २ किंवा अडीच तास पाणी मिळाले नाही आणि जे पाणी येते ते पिण्यायोग्य नसते.सदैव घाण व फेसाळ व दुर्गंधीयुक्त पाणी येते.महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या संबंधितांना वारंवार माहिती दिली. निवेदन दिले परंतु हा प्रश्न कायम आहे.

गोकर्णा पॉर्क येथील महिलांनी याबाबत आयुक्त लहाने यांना निवेदन दिले असून ही समस्या कायमची दूर करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदनावर मुक्ता संदीप कव्हले, सरिता प्रशांत केसर, अनिता सुरेश राऊत, कांचन स्वप्नील कव्हले, निकीता भोजापुरे, शारदा सचिन म्हैसने, प्राजक्ता राहुल देशमुख, स्वाती अतुल हिरळकर, रश्मी कव्हले, प्रभा देशमुख, सुमन नारायण नागे, उषा सुधाकर गाडगे, आशा सुभाष बुडूकने, जान्हवी वैभव सरनाईक, दिपाली अनिरुद्ध सरनाईक, मधुमाला वानखडे, उषा गाडगे,आरती पंकज अंबेरे, किरण देवत‌वाल,आनंदी दांदळे, वर्षा निखाडे वैशाली सोंडकर, मनीषा सोडकरयांच्यासह शेकडो महिलांनी स्वाक्षरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here