प्रयोग, प्रतिकृती व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संगम ! सन्मित्रमध्ये विज्ञान मेळावा दिमाखात

0

अकोला दिव्य न्यूज : सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती, नाटिका, चार्ट प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा तसेच आकर्षक वैज्ञानिक रांगोळीमुळे संपूर्ण शाळेत विज्ञानमय वातावरण निर्माण झाले होते.

विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विज्ञान शिक्षिका, इतर विषय शिक्षक तसेच उत्साही बालवैज्ञानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता ८ वीच्या धनश्री नेमाडे व दर्शना बेलसरे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी ‘Magic of Physics’या छोटेखानी प्रयोगाने करण्यात आली. त्यातून आपण राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा करतो, याची माहिती देण्यात आली. C. V. Raman यांच्या शोधकार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, यावर प्रकाश टाकण्यात आला.

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध दृश्य परिणामांमागील वैज्ञानिक कारणांचे सखोल विश्लेषण रूतुजा बोरकर (इ.९ वी), कृष्णाली लोखंडे (इ.९वी), ईश्वरी डोके (इ.९वी), निधी जाधव (इ.९ वी) आणि अनुष्का जुनारे (इ.८वी) यांनी प्रभावीपणे मांडले.

इयत्ता ५ वीच्या जिविका शिरसाट, आराध्या बहुराशी,आराध्या वाघोडे, माही चाकोते, माही दामोदर, आदिती पारधी व गुंजन मंजुळकर यांनी ‘विटामिन्सचे महत्त्व’ या विषयावर सुंदर नाटिका सादर करून संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले.

भौतिकशास्त्राची पायाभूत संकल्पना समृद्धी डांगे, ऋतुजा वानखेडे, गायत्री चोराडे, स्मृद्धी इंगोले,मनस्वी भरने व श्रुतिका जावरकर (इ. ७ वी) यांनी कृतीद्वारे स्पष्ट केली. कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर अंधविश्वास दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. इ. ७ वीच्या समृद्धी डोंगे हिने प्रभावीपणे मांडले.

यानंतर विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेला C. V. Raman, Homi J. Bhabha, Dr Vijay Bhatkar व Vikram Sarabhai अशी गटांची नावे देण्यात आली होती. इयत्ता ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात डॉ. विजय भटकर गट विजयी ठरला. या गटातील विज्ञानवीर ईश्वरी सातव (इ.६वी), यश मोरे (इ.८ वी), ईशांत राऊत व निधी जाधव (इ.९वी) होते.

वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत साची इंगोले हिने प्रथम तर हर्षाली समदुरे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. चिलात्रे सर यांनी साकारलेली C. V. Raman यांची रांगोळी विशेष आकर्षण ठरली.

विज्ञान प्रतिकृती स्पर्धेत दर्शन घरडे याने प्रथम, माही दामोदर व माही चाकोते (इ.५ वी) यांनी द्वितीय, तर वरुण आवले व श्रीजीत परदेशी (इ.८वी) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

अध्यक्षीय भाषणात राजपूत यांनी विद्यार्थ्यांना ‘आपला Why नेहमी जागृत ठेवा’ व तार्किक दृष्टीनी सभोवताली बघा, असा संदेश दिला. अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सांगता ८ वीच्या अंजली चर्हाटे हिने आभारप्रदर्शनाने केली. अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व प्राचार्या मनीषा राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रा देशपांडे, संगीता खर्चे व इतर शिक्षकवृंद यांनी या विज्ञान मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here