अकोला काटेपूर्णा बालविवाह ! ‘पोस्को’ प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

0

अकोला दिव्य न्यूज : काटेपूर्णा येथे पार पडलेल्या बालविवाह व ‘पोस्को’ प्रकरणातील तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अकोला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी पारित केला. अकोला तालुक्यातील अन्वी मिरजापूर येथील नितिन दुर्योधन उंबरकर, उर्मिला दुर्योधन उंबरकर व जया उर्फ ज्योती किसनराव गावंडे यांच्याविरुद्ध मुलगी अल्पवयीन असताना तिच्या मर्जीविरुद्ध लग्न लावून नितिन उंबरकर याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास अमरावतीहून वर्ग करण्यात आल्यानंतर बोरगावमंजू पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यास ११ साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे, सर्व साक्षीदारांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६१ अन्वये दिलेल्या जबाबाशी सुसंगत साक्ष नोंदविली. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. बचाव पक्षाने तीन साक्षीदार तपासले. एकूण १४ साक्षींच्या आधारे खटल्याचा निकाल देण्यात आला.
मात्र मुलीची जन्मतारीख व काटेपूर्णा येथे कथित विवाह झाल्याचा ठोस व विश्वासार्ह पुरावा सरकार पक्षाला वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करता आला नाही. तसेच साक्षीमधील तफावत आणि पुराव्यातील त्रुटी लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना निर्दोष घोषित केले.

आरोपी क्रमांक १ व ३ यांच्या वतीने ॲड.राजेश जाधव, ॲड. मुमताज देशमुख, ॲड.टिना नंदा, ॲड.सुनील जुनघरे, ॲड.प्रभात देशमुख, ॲड.समीर शेख व ॲड.रामराव चव्हाण यांनी कामकाज पाहिले. आरोपी क्रमांक २ कडून ॲड. शगणेश परियाल, ॲड.मुक्ता दाने, ॲड.ज्योत्स्ना बोदडे आणि ॲड.अक्षय नवलकार यांनी बाजू मांडली.

बालविवाह व ‘पोस्को’ अंतर्गत दाखल या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here