विद्यार्थ्यांनी दिला मानवतेचा संदेश ! सन्मित्र पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात

0

अकोला दिव्य न्यूज : बिर्ला कॉलनी येथे स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण व जल्लोषात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाशिक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुण्यांना गार्ड ऑफ ऑनर देत स्वागत केले. सन्मित्र ऑडिटोरियमच्या द्वारावर प्रमुख पाहुण्यांचे पारंपरिक तिलक पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत होते. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र हटकर व माया रविंद्र हटकर उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे प्रमुख पाहुण्यांची निवड पालकांमधून ईश्वरचिठ्ठीद्वारे करण्यात आली. पालक सन्मानाची ही अभिनव योजना संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांनी सुरू केली आहे.

यावेळी सन्मित्र पब्लिक स्कूलचे प्रेरणास्थान श्रीमती गोदावरीताई राजपूत तसेच विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा राजपूत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे सूर्य महाराणा प्रताप सिंह व विद्या अधिष्ठात्री माता सरस्वती यांच्या पूजनाने करण्यात आली. प्रा. शुभम नारे व त्यांच्या संगीत चमूने सादर केलेले स्वागतगीत विशेष आकर्षण ठरले. प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मागील वर्षी इयत्ता दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार कुमारी अदिती गावंडे हिला, स्मार्ट बॉय पुरस्कार भाविक काजळे याला तर प्रेटी गर्ल पुरस्कार प्राविण्या शेगोकार हिला प्रदान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या समीक्षा बऊराशी व ऋतुजा बोरकर यांचाही सत्कार करण्यात आला.

क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर यश मिळविणाऱ्या उज्वल करवते, अर्पिता करवते, रोशन साळवे, नील पांडे, अरविंद भोकरे, कृष्णा केशवार, आयुष जयस्वाल, आराध्या वाघोडे, अथर्व पस्तापुरे व पार्थ माकोडे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या दर्शन घरडे व धनश्री देशमुख यांचाही गौरव करण्यात आला.

पर्यावरण जागृतीसाठी शाळेमध्ये ‘निसर्ग कट्टा’ स्थापन करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेत यश मिळविणाऱ्या अनुष्का जुनारे व दर्शन घरडे यांचा सत्कार करण्यात आला. निसर्ग कट्टा सहभागाबद्दल शाळेला सन्मानचिन्ह व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. बेस्ट क्लास म्हणून इयत्ता पाचवीला ढाल प्रदान करण्यात आली.

पालकांच्या विविध खेळांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल चंद्रकला शिरसाट, विष्णू माकोडे, श्री व सौ. काजळे, शीतल दामोदर, विठ्ठल जाधव तसेच श्री व सौ. देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘Galaxy of Mathematicians’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकासाठी गणित शिक्षक श् श्याम यांचे मार्गदर्शन लाभले. पुस्तक मंडळाच्या अध्यक्ष तन्वी पळसपगार, उपाध्यक्ष ऋतुजा बोरकर तसेच सदस्य सायली ढोरे, ईश्वरी डोके, समीक्षा बऊराशी, त्रिवेणी तायडे, सचिन घरडे आदी विद्यार्थी होते.

प्राचार्या मनीषा राजपूत यांनी वर्षभरातील शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्यातील योजनांची माहिती पालकांना दिली व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पालकांना दिली. सन्मित्र स्कूल केवळ शाळा नसून परिवार असून विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम जडणघडणीसाठी विविध सण, उत्सव व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानझोडे तर आभार प्रदर्शन चित्रा देशपांडे यांनी केले. स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले. गीत, नृत्य, नाटिका, विडंबन व भारुडातून विद्यार्थ्यांनी मानवता, सहकार्य, सहिष्णुता, सौहार्द व प्रेम या मूल्यांचा प्रभावी संदेश दिला. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here