अकोला दिव्य न्यूज : Case register again coach : अकोला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने क्रीडापटू आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि चिंता पसरली आहे. अकोल्याचे क्रीडा क्षेत्राला कुस्ती कोच, बॅडमिंटन कोच ,कबड्डी कोच यांनी मलीन केले असून यातील काही गुन्हेगारांना कोर्टाने कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. तरीही अकोला क्रीडा क्षेत्रात गैरवर्तन होण्याचे थांबले नसल्याचे आज उघडकीस आलेल्या घटनेवरून परत एकदा सिद्ध झाले आहे.

आंतरशालेय कुस्ती स्पर्धानिमित्त आलेल्या कुस्तीपटू शालेय विद्यार्थ्याच्या वजन करताना विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अकोट फाईल येथील रहिवासी असलेल्या कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे विरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन स्थानिक नीमवाडी येथील पोलिस हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेतील कुस्तीपटू सहभागी झाले होते. यावेळी अनेक प्रशिक्षकही हजर होते. याठिकाणी कुस्तीपटूंचे नियमानुसार वजन करणे इत्यादी सर्व बाबी पार पाडाव्या लागतात. यावेळी एक चौदा वर्षीय युवक वजन करण्याकरिता आला असता त्याचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ चित्रीकरण श्री संत गाडगेबाबा आखाड्याचे प्रशिक्षक कुणाल माधवे यांनी केले. यावेळी माधवे हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करीत सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या आणि काही काळातच सदर फोटो हे व्हायरल सुद्धा केले.असे तक्रारीत नमूद केले आहे.

परिणामी यामुळे १४ वर्षीय विद्यार्थ्याची बदनामी झाली असून तो प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. पालकांनी त्यावेळी हा संपूर्ण प्रकार कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि क्रीडा सचिव अभिषेक फिरखे यांच्या कानावर सुद्धा टाकला असल्याचे तक्रारीत नमूद केले.या प्रकरणी खदान पोलिसांनी माधवे याचा मोबाईल जप्त करून त्याचा विरुद्ध बीएनएस २९६, ३५१(२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (बी) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.
कुस्ती प्रशिक्षक कुणाल माधवे वादग्रस्त ?
या सर्व प्रकरणाची माहिती होताच अनेकांनी कुणाल माधवे यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला आहे. बदनामी होण्याच्या भीतीने पोलिसात तक्रार करीत नसल्याची बाब समोर करीत यापूर्वीही कुणाल माधवे या प्रशिक्षकाने अनेकांचे असे छायाचित्रे, व्हिडियो आपल्या मोबाईल मध्ये बनविले असल्याची ओरड अनेक पालकांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी खदान पोलिसांनी कुणाल माधवे यांचा मोबाईल तपासात घेतल्यास आणखीन व्हिडिओ, छायाचित्रे समोर येण्याची शक्यता यावेळी अनेकांनी वर्तवली आहे.
