अकोल्यात हत्येचे सत्रच ! दोन दारुड्या मित्रांमध्ये झालेल्या वादात एकाची हत्या

0

अकोला दिव्य न्यूज : दोन दारुड्या मित्रांमध्ये वाद होऊन या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. याच रागातून डोक्यात दगड घालून एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जुने शहर परिसरात घडली. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपी पवन मोरे याला अटक केली आहे. प्रकाश जोसेफ असे मृतक तरुणाचे नाव आहे.

अकोला जिल्ह्यात किरकोळ कारणावरून हत्येचे सत्र सुरू असून जुने पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगरात दोन मद्यपी मित्रांमध्ये पैशांवरून झालेला वाद हत्याकांडावर पोहोचला. रमाबाई आंबेडकर नगरात प्रकाश व पवन हे दोन मित्र मद्यप्राशन करीत होते. यावेळी या मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाला. पैशांवरून त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. याचा राग पवनच्या मनात होता. मद्य प्राशन केल्याने दोघेही नशेत होते. दरम्यान, प्रकाशने पवनच्या घरासमोर जाऊन त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापाच्या भरात पवनने घराबाहेर येत प्रकाशच्या डोक्यावर मोठा दगड मारला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रकाशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून घटनेचा पंचनामा केला. पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जुने शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

हत्याकांडाच्या सत्राने अकोला जिल्हा हादरला

अकोला जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. अकोला शहरात मद्याच्या वादामधून काकानेच पुतण्याला मारून टाकले होते. दगडाने ठेचून ३१ मे रोजी ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २ जून रोजी सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची गुंड प्रवृत्तीच्या महेंद्र पवार याने निर्घृण हत्या केली. अकोट तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. पातूर तालुक्यातील विवरा परिसरात १० जूनला एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात ती हत्या असल्याचे स्पष्ट झाले. मद्य देण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात दोघांनी एकाची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर कौलखेड परिसरात यवतमाळ येथील एका इसमाची दारूच्या नशेत एकाने हत्या केली. बाळापूर तालुक्यात एकाची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला. अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत हॉर्न वाजवल्याच्या वादातून एकाची हत्या झाली. त्यानंतर आता जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत दोन मद्यपी मित्रांच्या वादात एकाची हत्या करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here