अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रात भाजप महायुतीला ‘ना भुतो ना भविष्यतो’, असं बहुमत असतानाही आज ५ दिवस उलटून गेले असताना मुख्यमंत्रीपदाचे नांव जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबाचे मोठं कारण म्हणजे ब्राह्मण समाजातील फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया मराठा समाजात उमटण्याची भाजपला भिती वाटत आहे. यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी पेचात सापडले असून एकनाथ शिंदे यांनी अत्यंत शांत असल्याने हा मुख्यमंत्रीपदासाठीची निवड रंजक वळणावर आला आहे. तर मतमोजणी नंतर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे जरांगे पाटील यांनी दिलेला इशारा बरेच काही सांगून जातेय.
निवडणूक काळात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ऐनवेळी घुमजाव करुन मराठा समाजाला वाटेल त्याला मतदानची मोकळीक दिली आणि सरसकट मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला. हे जाहीर झालेल्या निकालातून देखील उघडकीस आले आहे. आताही सरकारस्थापनेनंतर जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शिंदे यांना दूर करून ब्राह्मण समाजातील फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास त्याची प्रतिक्रिया समाजात उमटण्याची भीती भाजपला वाटत आहे.दरम्यान निवडणूक काळात मुख्यमंत्री पदासाठी कोणाची निवड करावी, यादृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठी देखील वेगळा विचार करत असल्याची कुणकुण लागल्यानेच कदाचित मतदाना पुर्वी विरार येथे विनोद तावडे प्रकरण घडवून आणले गेले असावे, अशी तेव्हाच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मराठा समाजाचा मुख्यमंत्री न करता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास या समाजात कोणती प्रतिक्रिया उमटेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फटका बसणार का, आदी मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी बुधवारी रात्री नवी दिल्लीत चर्चा केली. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने आणि मराठा समाजात फडणवीस यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास भाजपला त्याचा त्रास होईल का किंवा अन्य एखाद्या मराठा नेत्याचा विचार होऊ शकेल का, या मुद्द्यांवर शहा व तावडे यांच्यात चर्चा झाली.
मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपाबाबत चर्चेसाठी शहा यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना गुरुवारी रात्री बैठकीसाठी नवी दिल्लीत आमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना हे पद दिल्यास मराठा समाजाकडून विरोध होईल का, यासंदर्भात शहा यांनी बुधवारी रात्री तावडे यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्याविरोधात अनेकदा टीकास्त्र सोडले असून आताही सरकारस्थापनेनंतर आंदोलनाचा इशारा दिल्याने भाजपची चांगली कोंडी झाली आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असेही काही नेत्यांना वाटत आहे. या मुद्द्यांवर शहा व तावडे यांच्यात बैठक झाल्याने भाजप पक्षश्रेष्ठींकडून फडणवीस यांच्याऐवजी मराठा समाजातील नेत्याचाही विचार केला जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.