अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीआधी नेते भाजप सोडून जाताना दिसत आहेत. कागलमधील समरजितसिंह घाटगे यांच्यापाठोपाठ आता विदर्भातही एक बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली आहे. तीन वेळा गोंदियाचे आमदार राहिलेल्या गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थित गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, अपक्ष उमेदवार विनोद अगरवाल यांनी त्यांचा पराभव केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मदत न केल्याने पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा निवडून आले होते. २००४, २००९ आणि २०१४ मध्य गोंदिया विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.
मोठ्या अपेक्षेने भाजपामध्ये गेलो होतो
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना माजी आमदार गोपालदास अगरवाल म्हणाले की, मी मोठ्या अपेक्षेने भाजपध्ये पाच वर्षांपूर्वी प्रवेश केला होता. पण, आमच्याकडील भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजपाचा पराभव करण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षात भाजपामध्ये माझ्याप्रति विश्वास व सहकार्याची भावना मला खूप कमी दिसली.
माझ्याविरोधात उभ्या राहिलेल्या बंडखोर आमदारांना भाजपा सरकारची पूर्ण साथ मिळत आहे. त्यामुळे मला वाटते की या भागात फक्त लूट सुरू आहे. आमच्या भागातील सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचे काम झाले नाही, अशी टीका त्यांनी केली.