अकोला दिव्य ऑनलाईन: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणी केली जात असून, पश्चिम विदर्भात भाजपचा गड असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारीसाठी धागेदोरे बांधत आहेत.भाजपचा विजयाची हमी असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असून, अकोला नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक हरीशभाई आलिमचंदाणी यांनी देखील आपला दावा मजबूत केला आहे.
अकोला शहरात अल्पसंख्याक सिंधी समाजात भारतीय जनता पक्षाचा मोठा चेहरा असलेले हरीश आलिमचंदाणी आजही पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता आणि अकोला थॅलेसिमिया सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 28 वर्षांपासून विविध प्रभागातून नगरसेवक म्हणून कार्य करीत अकोला नगरपरिषदेत दोन वेळा आलिमचंदाणी यांनी नगराध्यक्ष भूषविले आहे.जनतेच्या हितासाठी सातत्याने विविध विकास प्रकल्प राबवित आहेत.शहरातील प्राथमिक सुविधा म्हणजे सुरळीत पाणीपुरवठा, वीज व पक्के रस्ते असून यासाठी त्यांनी पाठपुरावा करीत, काही प्रमाणात या सुविधा मिळवून दिल्या आहेत. महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि पक्षनेते म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी आलिमचंदाणी यांनी निष्ठेने पार पाडली आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात मागील 28 वर्षांपासून सक्रिय सहभाग असल्याने भारतीय जनता पक्षातर्फे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक असून आपणास उमेदवारी देण्यात यावी,या आशयाचे निवेदन त्यांनी माजी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे, खा.अनुप धोत्रे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे, आ.रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, भाजपा जिल्हा व शहर अध्यक्ष तसेच अकोला पश्चिम विधानसभा निरिक्षक विजय अग्रवाल यांना दिले आहे. हरीश आलिमचंदाणी यांचा दावा योग्य असून, पक्ष निष्ठा आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात ते सदैव अग्रेसर राहिलेले असल्याने भाजप नेते काय भूमिका घेतात हे कळून येईल.