अकोला दिव्य ऑनलाईन : विदर्भातील ख्यातनाम मल्टीस्टेट शेड्युल बॅक अकोला जनता बॅकेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक व जेष्ठ कॉंग्रेस नेते रमाकांत खेतान यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी तेल्हारा येथील अनिल अग्रवाल यांची निवड झाली. निवर्तमान अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग यांची फेरनिवड होण्याची शक्यता असताना खेतान यांच्या निवडीने धक्का बसला. अकोला जनता बॅकेच्या 2024 ते 2029 या कालावधीसाठी नवीन संचालक मंडळाच्या निवडीसाठी निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया 25 जुलै 2024 रोजी पार पडली. संचालक मंडळ निवडणुकीत 3 मतदारसंघातील 5 संचालकांची अविरोध झाली तर सर्वसाधारण मतदार संघाचे 13 सदस्य निवडण्यासाठी 24 जुलैला मतदान होऊन, 25 जुलैला मत मोजणी करण्यात आली. जनता सहकार पॅनलचे 13 उमेदवार निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काल जाहीर केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळातून अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी काल शुक्रवार 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. पदाधिकारी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. अध्यक्षपदासाठी केवळ रमाकांत खेतान आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल अग्रवाल यांचेच उमेदवारी अर्ज होते. त्यामुळे पिठासीन निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार यांनी अध्यक्षपदी खेतान तर उपाध्यक्ष म्हणून अनिल अग्रवाल यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एकुण 18 संचालकांपैकी अनिल अग्रवाल, विप्लव बाजोरिया, महेंद्र गढिया, ज्ञानचंद गर्ग, संतोष गोळे,शैलेंद्र कागलीवाल,रमाकांत खेतान, साकरचंद शाह, सुभाष तिवारी, सुनील तुलशान,माणिक धुत, गुरुमुख सिंग गुलाटी, साहेबराव गवई आणि मनोरमा सुरेंद्र पाराशर हे जुने तर शिवप्रकाश मंत्री,पंकज लदनीया, भरत व्यास तसेच मिनाक्षी नरेंद्र पटेल हे नवीन चेहरे आहेत.