अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता आणि अंतिम निर्णय घेण्याकरता आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार नव्हती. परंतु, आता या बैठकीला ते त्यांचा प्रतिनिधी पाठवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात एक्सवरून माहिती दिली. पुण्यात सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन केले असले तरीही आज मुंबईत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवत आहोत, असं आंबेडकर म्हणाले.
२ फेब्रुवारीनंतर झालेल्या एकाही बैठक किंवा कोणत्याही कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले नव्हते. तसंच, २४ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकर्त मेळाव्यातही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नव्हते. परंतु, तरीही आम्ही महाविकास आघाडीसाठी सकारात्मक आहोत, असंही आंबेडकर म्हणाले. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिनिधी पाठवण्यात येत आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा व्हावी, असं आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, सत्ता परिवर्तन महासभेमुळे वंचित आघाडीकडून महाविकास आघाडीच्या बैठकीला कोणीही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांकडून कालच स्पष्ट करण्यात आलं होतं. तसंच, ही बैठक २८ तारखेला आयोजित करण्याचीही विनंती करण्यात आली होती. परंतु, ही बैठक आज २७ तारखेलाच आयोजित करण्यात आली. त्यामुळे वंचितने त्यांचा प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.