अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने अनेक साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या एलटीटी-बल्लारशाह-एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीला आगामी मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २६ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२७ एलटीटी-बल्लारशाह विशेष गाडी आता २६ मार्च, २०२४ पर्यंत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. ही गाडी दर बुधवारी सकाळी ६:५२ वाजता अकोला स्थानकावर येऊन बल्लारशाहकडे रवाना होईल. त्याचप्रमाणे, २७ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११२८ बल्लारशाह-एलटीटी ही गाडी २७ मार्च, २०२४ पर्यंत दर बुधवारी बल्लारशाह येथून प्रस्थान करणार आहे. ही गाडी दर बुधवारी सायंकाळी ७:२७ वाजता अकोला स्थानकावर येऊन मुंबईकडे रवाना होणार आहे. ही गाडी आता पूर्वीच्या आयसीएफ काेचऐवजी २१ डब्यांच्या एलएचबी कोचसह धावणार आहे.