अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे अनेकांना त्यांची काळजी वाटू लागली आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी (१ नोव्हेंबर) जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना औषधोपचार घेण्याची विनंती केली आहे.
बच्चू कडू यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशीही बातचीत केली. यावेळी आमदार कडू म्हणाले, असा प्रामाणिक कार्यकर्ता समाजाला मिळत नाही. निस्वार्थ भावनेतून जरांगे यांनी मोठा लढा उभा केला आहे. कुठल्याही समाजाला असा कार्यकर्ता सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहावी, असं मला वाटतं.
आमदार बच्चू कडू म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली राहावी, त्यांनी पुन्हा लढण्यासाठी उभं राहावं, असं मला वाटतं. मी काल त्यांच्याशी बोललो. ते मला म्हणाले, आरक्षणासमोरच्या अडचणींवर चर्चा झाली पाहिजे. सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करतंय? याची सर्वांना माहिती असायला हवी. मी त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हटलं, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे असलेले तज्ज्ञ आणि मनोज जरागे पाटील तसेच त्यांचे सहकारी यांच्यात चर्चा व्हायला हवी. काही किंतू-परंतु असतील तर ते या चर्चेद्वारे समजून घेता येतील. त्यानंतर सरकार म्हणून आपले मंत्री जरांगे पाटलांशी चर्चा करतील. त्यांना आश्वासित करतील.
आमदार बच्चू कडू म्हणाले, माझी भूमिका आहे की, मराठा हाच कुणबी आहे. मराठा हा कुणबी नाहीतर मग कोण आहे? त्याचं उत्तर सर्वपक्षीयांपैकी कोणाकडे असेल तर ते त्याने सांगावं. एवढी मोठी नालायकी कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे. हा अन्याय आहे. मराठा हा कोणी नक्षलवादी नाही, व्यापारी नाही. शंभर टक्के मराठा मजूर किंवा कुणबी आहे. एवढं असूनही एवढं खोटं बोलावं… मराठा कुणबी नाही असं म्हणावं… मराठा हा ओबीसी नाही हे दरडावून सांगावं…ही खूप मोठी हराXXखोरी आहे.
सरकारसमोर दोन मार्ग
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले, आमचं लक्ष्य आहे की, मराठा समाजाला ओबीसी जातप्रमाणपत्र मिळालं पाहिजे, किंवा मराठ्यांना थेट आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण किंवा ओबीसी ओबीसी जातप्रमाणपत्र अशा दोन्ही पर्यायांची चाचपणी सरकारकडून सुरू आहे. आम्ही कालपासून त्यासंबंधीचे कागदपत्र तपासतोय. मी काल औरंगाबादेत काही तज्ज्ञांना भेटलो. ते म्हणाले, आपण दोन्ही मार्गांनी जात आहोत. आपल्याला नक्कीच यश मिळेल.