अकोला दिव्य न्यूज : नातेवाईकाकडील लग्नसमारंभ
आटोपून रात्री २ वाजताच्या सुमारास आपल्या मामेभावासह जंगलमार्गे घरी परत जात असलेल्या चार मुलींवर सात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितांपैकी तीन मुली अल्पवयीन आहेत. ही घटना गोंदिया शेजारील बालाघाट जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाण्याच्र हद्दीतील दुगलाई या गावाजवळ २५ एप्रिल रोजा रात्री घडली. याप्रकरणी बालाघाट पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. लोकेश म्हात्रे (२२), लालचंद खरे (२८), अजेंद्र बाहे, अज्जू बगडते (२१), राजेंद्र कावरे (२०), मणिराम बाहे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली ठाकूरटोला चौकी, गुद्री येथे २५ एप्रिल रोजी आयोजित लग्न समारंभात सहभागी झाल्या होत्या. रात्री २ वाजताच्या सुमारास या सर्व मुली मामेभावसोबत दुगलाईला जाण्यासाठी निघाल्या. दरम्यान, याच लग्नसमारंभात आलेल्या सात नराधमांनी त्यांचा दुचाकीने पाठलाग केला. नराधमांनी त्यांना जंगलात घेरले. त्यांच्या मामेभावाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देवून पळवून लावले. यानंतर नराधमांनी चार मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळी पीडित मुली तिच्या आईसोबत नागरिकसिंग टेकाम यांच्या घरी आल्या आणि लग्नात सहभागी भगतपूर येथील मुलांनी मुलींवर बलात्कारकेल्याचा आरोप केला. पोलिसांनी याप्रकरणी सातही नराधमांना अटक केली. यापैकी दोन आरोपी विवाहित असून, एकाला ३ मुले आहेत, तर अन्य विवाहित आरोपीची पत्नी गर्भवती असल्याचे समोर आले आहे. चार आरोपींपैकी दोन सख्खे भाऊ आहेत, तर चार पीडितांपैकी २ सख्ख्या बहिणी आहेत. सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी आणि अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. य घटनेने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्य प्रदेश सरकारवर टीका : या घटनेवरून काँग्रेस शहर अध्यक्ष संजयसिंह उईके, अनुभा मुंजरे, आदिवासी नेते दिनेश धुर्वे यांनी मध्य प्रदेश सरकार आणि बालाघाट पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तिला केली. उईके म्हणाले, भाजप सरकार आदिवासींचे शोषण करत आहे. भाजप सरकारमध्ये आदिवासींचा अपमान होत आहे, तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली जात आहे. अशा नराधम आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या येत आहेत. आरोपींनी कुटुंबीयांना आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला.
