अकोला दिव्य न्यूज : केंद्र सरकार जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर अॅक्शन मोडवर आलं आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानवर निर्बंध घालणारे 5 मोठे निर्णय काल घेतले. त्यानंतर लगेच अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. याशिवाय वायूदलाकडूनही युद्धाचा सराव सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकारने या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

या बैठकीआधी अमित शाह यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्र सरकारचं मोठं विधान समोर आलं आहे. कुठेना कुठे चूक झाल्याचं सरकारने कबूल केल्याचं वृत्त टीव्ही 9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. याशिवाय किरेन रिजिजू यांचं वक्तव्य देखील आता समोर आलं आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याबाबत केंद्र सरकारकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यात कुठेना कुठे चूक झाल्याचं सरकारने मान्य केलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर किरेन रिजिजू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू काय म्हणाले?
आमच्या विविध सुरक्षा यंत्रणांकडून आयबीकडून, गृह मंत्रालयाकडून घटना कशी झाली आणि कुठे चूक झाली याबाबत माहिती देण्यात आली आहे. घटना जिथे घडली ती जागा मुख्य रस्त्यावर घडलेली नाही. तिथे पायी जावं लागतं किंवा घोड्याने जावं लागतं. मुख्य रस्त्यापासून तिथे जाण्यास अडीच तास लागतात. याबाबत सांगण्यात आलं. सर्वपक्षीयांना सांगण्यात आलं की, सर्व काही चांगलं सुरु असताना या घटनेत चूक झाली आहे. या घटनेमुळे सर्व दु:खी आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी काय-काय केलं पाहिजे याबाबत अधिकाऱ्यांना सविस्तर सांगितलं आहे”, असं किरेन रिजिजू म्हणाले आहेत. दरम्यान, हल्ला घडला तिथे सुरक्षा दलाचा एकही जवान नव्हता असं पर्यटकांनीदेखील माध्यमांसमोर सांगितलं होतं.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?
सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीदेखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “केंद्र सरकारची आज सर्वपक्षीयांसोबत बैठक झाली. पहलगाममध्ये जी घटना घडली त्यावर सर्वांनी भाष्य केलं. सर्वपक्षीयांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. सरकारच्या कोणत्याही कारवाईला आमचं समर्थन आहे. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी आणखी चांगले प्रयत्न करावे. तिथे शांतता राखणं जरुरीचं आहे, असा मुद्दा आम्ही मांडला. त्यावर त्यांनी सुद्धा सर्व कारवाई केली जाईल, असं सांगितलं. अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. आमचा सरकारच्या प्रत्येक अॅक्शनला पूर्ण पाठिंबा असेल, असं राहुल गांधी म्हणाले. या सर्वपक्षीय बैठकीत हल्ल्यात जीव गमावणाऱ्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटे मौन पाळण्यात आलं.