अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने झटका दिला आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. कोलोरॅडो न्यायालयाने मंगळवारी ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांना अपात्र ठरवले आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले अध्यक्षीय उमेदवार आहेत ज्यांना यूएस घटनेच्या क्वचितच वापरल्या जाणार्या तरतुदीनुसार व्हाईट हाऊससाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.
यूएस राज्यघटनेची ती तरतूद “बंड किंवा बंडखोरी” मध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला राष्ट्राध्यक्ष पद धारण करण्यापासून प्रतिबंधित करते. यूएस राज्यघटनेच्या १४ व्या दुरुस्तीच्या कलम ३ अंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने असा निष्कर्ष काढला की, यूएस राज्यघटनेच्या तरतुदींनुसार यूएस सरकारच्या विरोधात कॅपिटल हिल हिंसाचार भडकावण्याच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.
या पदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांमध्ये ट्रम्प हे आघाडीवर होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ४ जानेवारीपर्यंत थांबवली आहे. यामुळे ट्रम्प या निर्णयाविरोधात आणखी अपील करू शकतात. मिनेसोटा आणि मिशिगनच्या न्यायालयांनी अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या नियुक्तीला आव्हान देणारे असेच खटले नाकारले आहेत, परंतु या मुद्द्यावर अनेक राज्यात खटले सुरू आहेत.