अकोला दिव्य न्यूज : पातूर नगरपरिषदेच्या नामफलकावरील उर्दूचा उल्लेख योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. मराठी व हिंदीसारखी उर्दू ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. तिचा जन्मच मुळी भारतीय भूमीत झाला. त्यामुळे तिला कोणत्याही धर्माशी जोडता येत नाही. उर्दू ही भारतासाठी परकीय भाषा आहे हा एक पूर्वग्रह आहे, असे कोर्टाने या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेचा नामफलक उर्दू भाषेत आहे. या बोर्डावर माजी नगरसेविका वर्षाताई बगाडे यांनी आक्षेप घेतला होता. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (अधिकृत भाषा) कायदा 2022 अंतर्गत उर्दूचा वापर करण्यास परवानगी नाही, असा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिथे त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. अखेर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. पण तिथेही त्यांची निराशा झाली.

ही याचिका भाषा व कायद्याच्या चुकीच्या समजुतीवर आधारित पातूर नगरपरिषदेचा नामफलक 1956 पासून आहे. येथील स्थानिकांना उर्दू भाषा मोठ्या प्रमाणात समजते. त्यामुळे हा नामफलक काढून टाकण्याची काहीच गरज नाही. मराठी व्यतिरिक्त उर्दू वापरण्यास कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही. 2022 च्या कायद्यानुसार किंवा कायद्याच्या कोणत्याही तरतुदीनुसार उर्दू वापरण्यास बंदी नाही. भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ही याचिकाच मुळात भाषा व कायद्याच्या चुकीच्या समजुतीवर आधारित आहे, असे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सुधांशू धुलिया व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी स्पष्ट केले.

न्यायालयीन कामकाजातही अनेक शब्द उर्दूचे : खंडपीठ पुढे म्हणाले, मराठी व हिंदीसारखीच उर्दू ही एक इंडो – आर्यन भाषा आहे. उर्दूचा विकास व भरभराट झाली. कारण वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणातील याच भाषेतून विचारांची देवाणघेवाण होत होती. लोक एकमेकांशी संवाद साधायचे. शतानुशतके त्यात सुधारणा होत गेली. अनेक प्रतिष्ठित कवींची ही भाषा पसंतीची बनली. फौजदारी व दिवाणी कायद्यातही उर्दू शब्दांचा फार मोठा प्रभाव आहे. अदालतपासून हलफनामा ते पेशी अशा विविध भारतीय न्यायालयांच्या भाषेत उर्दूचा मोठा प्रभाव आढळतो.

उर्दू मूळ भारतीय भाषा असूनही ती वसाहतवादी शक्तींमुळे मुस्लिम धर्माशी जोडली गेली. वास्तविक उर्दू भाषेचा जन्म कुठे झाला व तिच्या अस्तावर सविस्तर चर्चा करण्याचा हा प्रसंग नाही. पण एवढे म्हणता येईल की, हिंदी व उर्दू या दोन भाषांच्या मिश्रणातून हिंदी अधिकाधिक संस्कृतीकृत झाली, तर उर्दू भाषा अधिक पर्शियन झाली. उर्दूचे मूळ हे भारतात आढळले. त्यामुळे तिला कोणत्याही विशिष्ठ धर्माशी जोडता येत नाही.
भाषा ही विभाजनाचे कारण बनता कामा नये : भाषा ही विचारांच्या आदानप्रदानाचे एक माध्यम आहे. तिच्या माध्यमातून विविध विचार व श्रद्धा असणारे लोक जोडले जातात. त्यामुळे ती त्यांच्या विभाजनाचे कारण बनता कामा नये असे नमूद करत कोर्टाने वर्षाताई बागडे यांची याचिका धुडकावून लावली. पातूर नगरपरिषदेच्या हद्दीत राहणारे लोक किंवा लोकांचा समूह उर्दू भाषेशी परिचित असेल तर नगर परिषदेच्या फलकावर मराठीशिवाय उर्दू वापरल्यास त्यावर कोणताही आक्षेप असता कामा नये. नगरपरिषदेचा उर्दू भाषेतील नामफलक हा राजकारण किंवा धर्माशी संबंधित नाही.