अकोला दिव्य न्यूज : देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी पश्चिम विदर्भाचे सुपुत्र आणि अमरावतीकर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सद्यस्थितीत भूषण गवई हेच एकमात्र सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांची नियुक्ती निश्चितच आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या १४ मे रोजी गवईंना पदाची शपथ देणार आहेत.भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे भूषण गवई हे पुत्र आहेत.

काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काही महिन्यांनी बदलत आहेत. माजी सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच नोव्हेंबर २०२४ ला निवृत्ती घेतली होती. त्यांच्याजागी सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आले होते. पाच महिने होत नाही तोच त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाची धुरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या हातात जाणार आहे.
निवृत्त होण्यापूर्वी सरन्यायाधीश खन्ना यांनी या पदासाठी न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. यामुळे गवई हे ५२ वे सरन्यायाधीश बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डी.वाय चंद्रचूड वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.

भूषण रामकृष्ण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते न्यायाधीश होते. येत्या १४ मे रोजी गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. मात्र गवई देखील फार काळ सरन्यायाधीश पदी राहणार नाहीत. ते जवळपास सहा महिनेच या पदावर असणार आहेत. गवई हे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. २०१९ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले होते. भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. ते १६ मार्च १९८५ रोजी बारमध्ये सामील झाले.