अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या एप्रिल महिन्याच्या मासिक सभेत उन्हापासून घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन आणि होमिओपॅथी औषधाचे वितरण कार्यक्रम संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ प्रशांत प्रकाश बाहेती उपस्थित होते.

मंचावर संघटनेच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड, सचिव एकनाथराव उके, कार्यकारणी सदस्य प्रा किशोर बुटोले, देविदास निखारे उपस्थित होते.
सर्वप्रथम मागील सभेनंतर आजपर्यंत ज्या सभासदांचे निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड यांनी केले.
प्रमुख अतिथी डॉ प्रशांत प्रकाश बाहेती यांचा शाल श्रीफळ पुस्तक आणि प्रगतीपथ पुस्तिका देऊन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाहेती आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी डॉ प्रशांत बाहेती यांनी मार्गदर्शन करताना उष्माघात म्हणजे काय, लक्षणे कोणती, त्याच्यावर करावयाच्या उपायोजना, उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी यावर सहज सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले. कोणत्याही व्यक्तीला होणारा आजार याचे मूळ कारण म्हणजे मानसिक ताण तणाव, बदलती जीवनशैली व नकारात्मक विचार, हे आहेत. म्हणून सर्व ज्येष्ठांनी आपले जीवन आनंदी जगण्यासाठी नेहमी सकारात्मक क्रियाशील आणि मानसिक ताणं तणाव न ठेवता योग्य जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन केले.
सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आणि मागील 18 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभव ही कथन करताना अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सत्यनारायण बाहेती यांनी संस्थेच्या स्थापनेला 25 वर्ष झाले असून हे वर्ष रौप्य महोत्सवीवर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यातील हा पहिला कार्यक्रम वर्षभर अशाप्रकारे सेवानिवृत्त आणि जेष्ठांसाठी घेण्यात येईल.
सचिव एकनाथराव उके यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले
याप्रसंगी संघटनेचे जेष्ठ सदस्य आणि निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला सदस्य उपस्थित होते.