अकोला दिव्य न्यूज : गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीकरांना प्रतीक्षा असलेलं अमरावती विमानतळ आज बुधवार १६ एप्रिल पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले असून विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग पार पडलं आहे. मुंबईवरून सकाळी साडेआठच्या सुमारास उड्डाण करणारं विमान सव्वा अकरा वाजता अमरावती विमानतळावर प्रवाशांना घेऊन सुखरूप उतरलं.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवासी घेऊन अमरावती विमानतळावरून ११.३० वाजता प्रवासी विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. पाठोपाठ एअर इंडिया एफटीओच्या डेमो फ्लाईटने अमरावती विमानतळावरून देखील उड्डाण झाले.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारितील अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज १६ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अलायन्स एअर कंपनीची मुंबई–अमरावती–मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. अलायन्स एअर कंपनी अमरावतीवरुन मुंबई अशी विमान सेवा सुरू केली आहे.

आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई अशी प्रवासी विमानसेवा सुरू राहणार आहे. या दोन प्रमुख शहरांमधील अंतर आता अवघ्या पावणे दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे १० तास वाचतील. रस्त्याने याच प्रवासाला १२ ते १३ तास लागतात.
अमरावती येथून विमानसेवेचा शुभारंभ करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की महाराष्ट्रात आणखी लवकरच सुरू होणाऱ्या विमानतळांची नावे त्यांनी घेतली. पण यामध्ये अकोला विमानतळाचे मात्र नांव नव्हते.
असं आहे अमरावती विमानतळ
- अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे.
- आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे.
- विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात.
- ऑक्टोबर महिन्यात विमानतळावर नाईट लॅण्डिंग देखील सुरू होणार आहे.