अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरासोबतच पश्चिम विदर्भातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले, भक्तांच्या नवसाला पावणारे आणि अनेक भक्तिमय उपक्रम साकार करणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सव शनिवार 12 एप्रिल रोजी असून यात अनेक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असल्याची माहिती सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हनुमान जन्मोत्सवात प्रथमच येथील कुंभ मेळ्याच्या देखावा सादर करण्यात येणार असून यात प्रयागराज येथील त्रिवेणी संगम, देव असुरांचा समुद्रमंथन देखावा, श्रीराम दरबार देखावा, काशी तीर्थक्षेत्र आदीचा देखावा साकार करण्यात येणार आहे. महानगरात प्रथमच भक्तांसाठी अशी देखाव्यांची भक्तिमय पर्वणी सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने साकार करण्यात येत आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिनी सकाळी 5-30 वाजता भगवंताचा जन्मोत्सव पुरोहित व मान्यवर यजमानांच्या हस्ते भक्तीभावात संपन्न होणार आहे.

या उत्सवाचे यजमान व उद्योजक नंदकुमार आलिमचंदानी तथा राहुल मित्तल आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित राहणार आहेत. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार 11 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता ख्यातीप्राप्त सालासर सत्संग मंडळातर्फे सामूहिक सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी 7 वाजता हनुमान स्त्रोत व आरतीचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे.

उत्सवाची विहंगम झाकी भक्तांच्या दर्शनार्थ 14 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार आहे. जन्मोत्सवाच्या दोन दिवसीय महोत्सवात भाविक भक्तांसाठी विशेष व्यवस्था सेवा समितीने उपलब्ध केली असून परिसरात सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आले आहेत. तसेच बालकांसाठी उद्यान व खेळण्यासाठी अनेक स्टॉल लावण्यात येत असून या पर्वावर मंदिरात रंगीत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार असून पूजा सामग्री व बच्चे कंपनीच्या करमणुकीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.

भाविकांनी या दोन दिवसीय हनुमान जन्मोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन सालासार बालाजी सेवा समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले असून उत्सवाच्या सफलतेसाठी सालासर बालाजी सेवा समितीचे समस्त पदाधिकारी व सेवाधारी मेहनत घेत आहेत.
