Saturday, April 19, 2025
HomeUncategorizedOPT रद्द ? 3 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला ! ट्रम्प सरकारचं...

OPT रद्द ? 3 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला ! ट्रम्प सरकारचं नवीन विधेयक

अकोला दिव्य न्यूज : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत आणि वादात अडकले आहेत. त्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांची पाठवणी आणि जगभरातल्या देशांवर सरसकट रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटले. आता अमेरिकन स्टेट काँग्रेसमध्ये (लोकप्रतिनिधीगृह) डोनाल्ड ट्रम्प सरकारने प्रस्तावित केलेलं एक नवीन विधेयक तिथे राहणाऱ्या ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावरच उठण्याची शक्यता आहे !

अमेरिकन काँग्रेससमोर सादर झालेल्या या विधेयकामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत शिक्षण किंवा त्यानंतर तिथे कामाचा अनुभव घेण्यासाठीच्या व्हिसा नियमांमध्ये या विधेयकामुळे मोठे फेरबदल होणार आहेत. हे विधेयक अमेरिकन काँग्रेसनं पारित केल्यास तिथे राहणाऱ्या अशा भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने देश सोडून मायदेशी परतावं लागणार आहे.

STEM अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फटका : या विधेयकामुळे अमेरिकेत राहणाऱ्या सर्व विदेशी विद्यार्थ्यांच्या वास्तव्यावर टांगती तलवार आली आहे. यात प्रामुख्याने STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल प्रॅक्टिलक ट्रेनिंगचा (OPT) पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण व त्यानंतर करिअर घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

काय आहे OPT उपक्रम? OPT उपक्रमांतर्गत अमेरिकेत पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काम शोधण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्या व्हिसाची मुदत एक वर्षासाठी वाढवता येते. ही एक वर्षाची मुदत नंतर आणखीन दोन वर्षांसाठी वाढवता येते. यासाठी तुम्ही STEM अभ्यासक्रमाचे पदवीधर असणं आणि अमेरिकेत एखाद्या नामांकित व्यक्ती वा संस्थेत अनुभवासाठी काम करत असणं ही अट ठेवण्यात आली आहे. पण नवीन विधेयकात STEM विद्यार्थ्यांसाठीचा OPT चा पर्यायच काढून घेण्याचे प्रस्तावित आहे.

काय सांगते आकडेवारी ? हिंदुस्तान टाईम्सनं ओपन डोअर् २०२४ या अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, २०२३-२४ मध्ये अमेरिकेत शिकत असलेल्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक होतं. या काळात अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण तब्बल ३ लाख ३१ हजार ६०२ इतकं होतं. त्याआधीच्या वर्षापेक्षा हे प्रमाण तब्बल २३ टक्के अधिक होतं. यापैकी ९७ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी OPT चा पर्याय निवडला होता. त्याआधीच्या वर्षापेक्षा हे प्रमाण ४१ टक्क्यांनी अधिक होतं.

याआधीही मांडलं होतं हे विधेयक! दरम्यान, अमेरिकन काँग्रेससमोर याआधीही हे विधेयक मांडण्यात आलं होतं. पण काँग्रेसनं ते नामंजूर केलं होतं. यंदा ट्रम्प यांच्या बेकायदा स्थलांतरितांविरोधातील मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला पुन्हा महान करण्याच्या प्रयत्नांच्या दबावापुढे हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!