अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधायकांनुसार कृषी निविष्ठा व्यावसायिकांवर नवीन कायदे लादल्या जात आहे. त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दि.२ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत असे तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात व्यावसायिक संघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाने कृषी निविष्ठा व्यावसायिकांबाबत विधेयक क्रमांक ४० ते ४४ नुसार नवीन कायदे लादल्या आहेत. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी या कृषी निविष्ठा व्यावसायिकांकरीता अत्यंत जाचक व अन्यायपूर्ण असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. हे कायदे लागू जाल्यास कृषी निविष्ठा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे या कायद्यांविरोधात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईड सीड्स डिलर्स असोसिएशनमार्फत दि.२ ते ४ नोव्हेंबर कालावधित बंद पुकारलेला आहे.
बंदला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने पाठिंबा देणार असल्याचे संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ठरले आहे.त्यामुळे आगामी दि.२ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून, त्यावर अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष मोहन सोनवणे, सचिव डॉ. मंदार सावजी यांची स्वाक्षरी आहे. ऐन रब्बी हंगामाच्या लगबगीत कृषी निविष्ठा केंद्र बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधेयकांचा निषेध म्हणुन पहिल्या टप्प्यात तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी सरकारच्या संपर्कात आहे. मागणी मान्य न झाल्यास अधिवेशनच्या काळात सर्व व्यावसायिक आक्रमक भुमिका घेतील.
- मोहन सोनोने, अध्यक्ष, अकोला जिल्हा कृषि व्यावसायिक संघ.