अकोला दिव्य न्यूज : हक्काचं घर, स्वतःच घर, हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील एक स्वप्न आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत शुभमुहूर्तावर खरेदीचा व्यवहार केला जातो. सणांच्या दिवशी हा व्यवहार पार व्हावा, असं नियोजन केले जाते. ही बाब लक्षात घेऊन गुडी पाडवा आणि रमजान ईद निमित्त सुट्टी असताना देखील खरेदी विक्रीचा व्यवहार पार पाडण्यासाठी सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहणार आहेत. येत्या 29, 30 आणि 31 रोजी शासकीय सुट्टी आहे. गुडी पाडवा निमित्ताने दिनांक 30 मार्चला आणि 31 मार्चला रमजान ईद साजरी केली जात आहे. परंतु नागरिकांना सणाच्या शुभ दिवशी घर खरेदी करावयाचे असल्याने नोंदणी व मुद्रांक विभागाने सुटीचे तीनही दिवस कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अकोला येथील सह दुय्यम निबंधक निलेश शेंडे यांनी केले आहे.

वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते (रेडी रेकनर) दरवर्षी 1 एप्रिल रोजी प्रसिध्द होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात, मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच महत्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे, हे लक्षात घेवून दि.29 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षअखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येत आहेत. असे आदेश महाराष्ट्र राज्य नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी दिले असून या बाबतच्या सूचना अधिनस्त असलेल्या सर्व दुय्यम निबंधक यांना देण्यात आल्याचे शेंडे यांनी सांगितले.