अकोला दिव्य न्यूज : ईदच्या निमित्ताने भाजपामुस्लीम समाजाला विशेष गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा देशातील ३२ लाख गरीब मुसलमानांना ईदसाठी ‘सौगात ए मोदी’ किट देणार आहे. जेणेकरून ईद साजरी करण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण होऊ नये. ईदसाठी हे गिफ्ट गरजू मुस्लिमांसाठी वाटप केले जाईल. अल्पसंख्याक मोर्चाचे ३२ हजार पदाधिकारी देशातील ३ हजार मशिदींमध्ये जाणार आहेत. त्याठिकाणी ३२ लाख गरजू मुस्लीम व्यक्तींना मदत केली जाणार आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गरीब मुस्लीम कुटुंबाला ईद साजरी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. या अभियानातंर्गत भाजपा गरजवंत मुस्लीम समाजापर्यंत पोहचणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात गरीब, गरजू शेजारी यांना मदत करण्यावर भाजपाने जोर दिला आहे. अल्पसंख्याक मोर्चा गुड फ्रायडे, ईस्टर, भारतीय नववर्षात सहभाग घेत सौगात ए मोदी किट वितरीत करेल. त्यामुळे सांप्रदायिक सलोखा वाढवण्यास मदत होईल असं भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.
‘सौगात ए मोदी’ किटमध्ये काय काय आहे ?
भाजपाने ‘सौगात ए मोदी’ अभियानाची घोषणा केली. या किटमध्ये खाण्या पिण्याच्या गोष्टींसोबत कपडे, शेवई, खजूर, ड्राय फ्रुट्स आणि साखर असेल. महिलांसाठी या किटमध्ये सूटचे कपडे असतील. पुरुषांसाठी किटमध्ये कुर्ता पायजमा असणार आहे. या प्रत्येक किटची किंमत ५०० ते ६०० रूपये इतकी आहे. गरीब आणि गरजू मुसलमानांना ईद साजरी करता यावी यासाठी भाजपा हा उपक्रम राबवत आहे.
दरम्यान, भाजपाकडून जिल्हास्तरावर ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल. सौगात ए मोदी अभियानात भाजपाकडून मुस्लीम समुदायाला आकर्षित करत त्यांच्यासाठी कल्याणकारी योजनांची माहिती देणे, भाजपा आणि एनडीएसाठी त्यांचा पाठिंबा वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. मुस्लीम समुदायातील काही शिक्षित युवा, महिलांनी लोकसभेला मोदींना मतदान केले होते. मुस्लिमांचे मतांसाठी राजकारण करणाऱ्या पक्षांवर त्यांचा विश्वास नाही असं भाजपा प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटलं.