Friday, April 4, 2025
HomeUncategorizedनागपूरचे 'बुलडोझर' कायद्याच्या कचाटयात ! दंगलीतील आरोपीवर कारवाई पक्षपाती, उच्च न्यायालय संतप्त

नागपूरचे ‘बुलडोझर’ कायद्याच्या कचाटयात ! दंगलीतील आरोपीवर कारवाई पक्षपाती, उच्च न्यायालय संतप्त

अकोला दिव्य न्यूज : नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी महापालिकेने ‘बुलडोझर’ने कारवाई केली. कारवाई सुरू असताना फहीमच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदविले.

नागपूर महापालिकेने फहीम खानच्या संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीवर सोमवारी सकाळी बुलडोझर कारवाई केली. विशेष म्हणजे, हे घर फहीम खान यांच्या नावावर नसून त्यांची आई जेहरुन्निसा यांच्या नावावर होते. महापालिकेने जेहरुन्निसा यांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम २४ तासांत पाडून टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक जेहरुन्निसा यांच्या घरी पोहोचले व काही तासांत त्यांनी दोन मजली इमारत भुईसपाट केली. याविरुद्ध जेहरुन्निसा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

महापालिकेने शुक्रवारी दुपारी अतिक्रमणाबाबत नोटीस दिली. शनिवारी आणि रविवारी सुट्टी होती. सुनावणीची संधी न देता सोमवारी सकाळीच घर तोडण्याचे काम सुरूही करून टाकल्याचे यात म्हटले आहे. न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृशाली जोशी यांच्या खंडपीठाने याचिका तातडीने दाखल करून घेत महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

महापालिकेने सकाळी १० वाजता कारवाई सुरू केली. मात्र कारवाई करण्याबाबतची नोटीस दुपारी १ वाजता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवली, असा आरोप याचिकेत करण्यात आला असून महापालिकेने मात्र केवळ अवैध बांधकाम तोडल्याचा दावा न्यायालयात केला. हिंसाचारातील दुसरा आरोपी अब्दुल हफीज शेख याच्या घरावरील कारवाईलाही स्थगिती देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार, बांधकाम तोडले नसल्याने नुकसानभरपाईचा मुद्दा याचिकेत समाविष्ट करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या.

नागपूर महापालिकेने नियमांचे पालन केले नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांनाही स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. अँड.अश्विन इंगोले यांनी खान यांची बाजू मांडली. याचिकेवर पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!