अकोला दिव्य न्यूज : जगातील सर्वाधिक गणपती मुर्तींचे अद्वितीय संग्रह असलेल्या नंद उद्यान व गणपती संग्रहालय आणि नंद मित्र मंडळाच्या सहकार्याने एक ऐतिहासिक उपक्रम उद्या मंगळवार 25 मार्च रोजी पार पडणार आहे. गेल्या ५० वर्षांपासून विविध आकार आणि प्रकारातील गणपतीच्या मूर्तीचे संग्रह करून प्रदिप नंद (गोटु) आजवर तब्बल ६५ हजार गणपतीच्या मुर्त्या आठ दालनांत सुसज्ज केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी संग्रहालय सन्मानित झाले असून याच संग्रहालयाच्या प्रेरणेतून १२ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळात तब्बल अडीच हजार किलो रांगोळीचा वापर करुन भारतातील सर्वांत मोठी गणपती रांगोळी साकारण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे अकोल्यातील सुप्रसिद्ध चित्रकार व कलाकार अमृता कुशल सेनाड यांचे कौशल्य ! गणेशभक्ती आणि कलाकृती यांचा समन्वय साधून गणपतीचे भव्य पोर्ट्रेट रांगोळीच्या माध्यमातून हा विक्रम घडवणार आहेत.
अकोला बाभुळगाव जवळ असलेल्या नंद पेट्रोल पंपाच्या मागे, नंद तारांगण परिसर, दीप अँटिक जवळील मोठ्या प्रांगणात ही रांगोळी साकारण्यात येणार असलेली ही भव्य रांगोळी उद्या मंगळवार २५ मार्चला सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रेक्षकांना बघण्याकरिता खुली राहणार आहे.
या आयोजनात संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ.माधव देशमुख, सुधाकर देशमुख, धनंजय तायडे, श्रीकांत देशपांडे, राज पवित्रकार, अविनाश पाटील, आतिकखान पठाण, राजाभाऊ होरे, जितेंद्र इंगळे, आकाश इंगळे, मधुकर बोदडे, शिवम बोदडे, अनिकेत पडघान, शिवम जोशी, रुद्र जोशी, सलीम खान पठाणसह नंद मित्र मंडळाचे विशेष योगदान असणार आहे. सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन अकोल्याच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.