अकोला दिव्य न्यूज : बीड जिल्हा सरपंचांसह इतर सर्वसामान्य नागरिकांच्या हत्यांनी गाजत असताना आता जळगांव जिल्हाही त्याच वळणावर जातो की काय, असे वाटणारी एक घटना जळगाव तालुक्यातील कानसवाडे येथे घडली आहे. शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची शुक्रवारी सकाळी किरकोळ कारणावरून तिघांनी धारदार शस्त्राने हत्या केली. नशिराबाद पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपासाला गती देण्यात आली आहे.

बीड जिल्हा काही दिवसांपासून हत्या, मारहाणीच्या घटनांवरुन गाजत आहे. दररोज बीड जिल्ह्यातील कुठले ना कुठले प्रकरण बाहेर येत आहे. या घटनांवरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. बीड जिल्ह्यातील हत्यांना जातीय संघर्षही कारणीभूत असल्याचे मानले जाते. बीडमधील हत्यांचे लोण इतरत्र पोहोचू नये, अशी अपेक्षा असताना जळगाव जिल्ह्यात माजी उपसरपंचाच्या हत्येने सर्वच भयभीत झाले आहेत.
युवराज सोपान कोळी (३६) हे कानसवाडे येथे शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. आई-वडील, पत्नी आणि मुलांसह ते वास्तव्यास होते. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवायचे. गुरूवारी रात्री गावातील काही जणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले.

युवराज कोळी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहताच आजुबाजुचे ग्रामस्थ धावत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखार घटनास्थळावरून पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी तातडीने भेट दिली. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.