अकोला दिव्य न्यूज : नागपुर शहरातील महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. या ठिकाणी आज दुपारी आंदोलन झालं होतं. यानंतर टप्प्याटप्याने इथे वाद वाढत गेला. अखेर आज रात्री या परिसरात दोन गट आमनेसामने आले. यावेळी प्रचंड दगडफेक करण्यात आली. परिसरातील वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच एका गटाच्या जमावाला पांगवलं. पोलिसांनी एका गटाच्या जमावाला हुसकावून लावलं. पण दुसरा गट अजूनही आक्रमक झालेला बघायला मिळतोय. या जमावाने क्रेन जाळली. तसेच जमावाकडून अनेक गाड्यांना जाळून टाकलं आहे. याशिवाय पोलिसांच्या दिशेला मोठ्या प्रमाणात दगडफेक होत आहे. मोठमोठ्या विट्या, दगड पोलिसांच्या दिशेला फेकले जात आहेत.पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. पण दगडफेक करणारे तरुण शांत होताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून प्रचंड दगडफेक केली जात आहे.
या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच आग विझवण्यासाठी दाखल झालेले अग्निशामक दलाचे जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी जखमी झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रतिक्रिया दिली. “आंदोलक दगड, चाकू फेकून मारत आहेत, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. आम्ही आग विजवत असताना दगड लागला. ते दगड, चाकू, तलवारी डायरेक्ट मारुन फेकत आहेत. जे हातात येईल ते मारुन फेकत आहेत. दगड जास्त फेकत आहेत. आम्ही आग विझवत होतो. सर्व पोलीसवाले मागे होते. आमच्यावर डायरेक्ट दगडफेक केली, अशी प्रतिक्रिया अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
