अकोला दिव्य न्यूज : अकोलेकरांनी रंगाची मुक्तपणे उधळण करून मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. विविध कॉलनी व वसाहत परिसरात बच्चे कंपनीसह महिलांनी एकत्र येऊन रंगाची उधळण केली. एकमेकांना शुभेच्छा देऊन रंग लावण्यात आला. अनेक ठिकाणी स्पीकरवर गाण्यांच्या तालावर रंग खेळण्यात दंग झालेली तरुणाई असे चित्र आज शुक्रवारी अकोला शहर व अकोला ग्रामीण परिसरात दिसून आले.

अकोला शहर व ग्रामीण भागात होळी व धुलीवंदन सण गुरुवार व शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर गुरुवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज शुक्रवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात लहान मुलांसह नागरिकांनी एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरी केली.

तर गुरुवारी शहराबरोबरच ग्रामीण भागात रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन कार्यक्रमांचे आयोजन केले होते.ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अकोला शहरातील पश्चिम भागात अर्थात जुने अकोला परिसर तसेच खोलेश्वर, राजपूत पुरा, निमवाडी, आनिकट, हरिहरपेठ, अक्कलकोट, शिवाजी नगर, बाळापूर नाका, गणेश नगर, डाबकी रोड यासह जुन्या अकोल्यात ठिकठिकाणी सकाळी आठपासून धुलीवंदनाला प्रारंभ झाला. तरुण मुले गटागटाने फिरून एकमेकाला रंग लावून शुभेच्छा देत होते. रंग न खेळता घरात राहिलेल्यांना घराबाहेर काढून रंग लावण्यात येत होता.

धुलीवंदनाचा सण महिला बच्चे कंपनीने देखील उत्साहात साजरा केला. शहरातील विविध कॉलनी, सोसायटीमध्ये महिलांनी एकत्रित येऊन रंगाचा आनंद लुटला. लहान मुलांनी आपल्या मित्रासह पिचकाऱ्या तसेच कोरड्या रंगाची उधळण करून जल्लोष साजरा केला. अनेक हाउसिंग सोसायटी, कॉलनी परिसरात धुळवड साजरी करतानाच एकत्रित जेवणाचा आनंद घेण्यात आला.

गल्लोगल्ली व चौकाचौकात डिजे आणि लाऊडस्पीकर लावून गाणी वाजविली जात होती. या गाण्यावर अबालवृद्धांनी ठेका धरला. एकमेकांना कोरडा रंग लावून होळीचा आनंद लुटला.

धुळवडीला कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यासोबतच दामिनी पथक, शीघ्रकृती दल, साध्या वेशातील पोलिसही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. पोलिस ठाण्याच्या गस्तीसोबतच गुन्हे शाखेची गस्तही दिवसभर सुरू होती.
