अकोला दिव्य न्युज ब्युरो : आमदार अपात्रता सुनावणीवरील निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांनी वेळ वाढवून मागितला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निर्णय द्या, अशा आदेशवजा सूचला केल्या आहेत. पण, अध्यक्षांची भूमिका लक्षात घेतली तर त्यांना हे प्रकरण प्रलंबित ठेवायचे आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ते निर्णय देऊ शकत नाहीत. याचा अर्थ अध्यक्षांची भूमिका सुसंगत नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री बाळासाहेबांचे नाव घेतात आणि रोज सकाळ-सायंकाळ दिल्लीदरबारी मुजरा करतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे आम्हाला कुठलाही निर्णय घ्यायला दिल्लीला जावे लागत नाही. आता तेदेखील दिल्लीत मुजरा करतात. यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि सन्मानाला धक्का लागला आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
विधानभवन परिसराबाहेर लागलेल्या सत्तापक्षातील नेत्यांच्या मोठ्या कटआउटवर बोलताना ते म्हणाले,‘एकीकडे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवित आहे. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या गळ्यात दोराचा फास लटकवित आहे. विधानभवनाच्या बाहेर मोठमोठे कटआउट लावून आपल्या कर्तृत्वाची छबी दाखविण्याचा प्रयत्न करताहेत. पण, यातून लोकांच्या समस्या सुटत नाहीत. लोकांनी तुमचे फोटो पाहण्यापेक्षा तुम्ही घेतलेल्या लोकहिताचे निर्णय घराघरापर्यंत पोहचतील तर लोकांच्या घरात तुमचे फोटो लागतील.