अकोला दिव्य न्यूज : भारतीय संस्कृतीमध्ये होळी-रंगपंचमी उत्सव आनंद, बंधुत्व, आणि स्नेह यांचे प्रतीक आहेत. परंतु सध्याच्या काळात या सणांचे स्वरूप बदलत आहे आणि याचा निसर्गावर व पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने हे सण साजरे करणे गरजेचे आहे. होळी साजरी करताना झाडांची कत्तल टाळा.जैविक व सुकलेल्या काड्या, शेण, गवत आणि नैसर्गिक सुकलेले साहित्य वापरा.म्हणजे होळी आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करून निसर्ग, पर्यावरण, प्राणी आणि मानव या सर्वांचा सन्मान राखू या, असं आवाहन धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्यावतीने प्रकल्प प्रमुख निलेश देव यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

संकल्पपूर्वक होळी: आवश्यक तेवढेच इंधन वापरा, उर्जेचा अपव्यय टाळा.पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी कोरडी होळी साजरी करण्याचा विचार करा. छोट्या-छोट्या जागी वेगळ्या होळी पेटवण्याऐवजी एकत्रित सामूहिक होळी साजरी करा.

पर्यावरणपूरक रंगपंचमी : केमिकलयुक्त रंग आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी हानिकारक असतात. याऐवजी हळद, बीट, गुलाब, पालेभाज्या यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले रंग वापरा.
पाणी बचत करा: जास्त पाण्याचा वापर टाळा. शक्य असल्यास कोरडी रंगपंचमी साजरी करा.

हीच खरी जबाबदारी : प्राण्यांना रंग लावणे टाळा. त्यांना त्रास होतो तसेच त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सणानंतर परिसराची स्वच्छता राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सण साजरा करा, पण निसर्ग वाचवा. पर्यावरणपूरक सण, सुंदर भविष्यासाठी सज्ज. हीच खरी संस्कृती, हीच खरी जबाबदारी असं देव यांनी सांगितले.
