अकोला दिव्य न्युज ब्युरो : जुनी पेन्शन लागू करण्यासोबतच प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने आज गुरुवार 14 डिसेंबरपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे.आजपासून संपाला सुरुवात होत असल्याची बहुतांश नागरिकांना माहिती नव्हती. सरकारी कार्यालयात आल्यानंतर माहिती झाल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने 11 डिसेंबरला जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज सकाळी कार्यालयात हजर झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी संपाला सुरूवात झाली. जुनी पेन्शन लागू करणे, रिक्त पदांवर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया राबविणे, वेतन तृटी निराकरण करणे व इतर महत्वपूर्ण कर्मचारी हिताच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध राज्य शासकीय व निमशासकीय जिल्हा परिषद यांच्या प्रवर्ग संघटना व समन्वय समिती यांनी 14 डिसेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन तथा बेमुदत संप घोषित केला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना संलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखा अकोला आणि त्या अंतर्गत असलेल्या ग्रामसेवक युनियन, जि.प.प्रशासन अधिकारी संघटन, जिल्हा परिषद नर्सेस संघटना, आरोग्य विस्तार अधिकारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, जि.प.कुष्ठरोग कर्मचारी संघटना, कृषी तांत्रिक संघटन, जि.प.औषध निर्माण अधिकारी संघटना, जि.प.आरोग्य कर्मचारी युनियन, जि.प.हातपंप देखभाल दुरुस्ती संघटना तसेच
जि.प. अभियंता संघटना, विस्तार अधिकारी (पंचायत समिती. I.R.D.P.) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना, जि.प.विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संघटना,जि.प.चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, जि.प.लेखा कर्मचारी संघटना, जि.प.वाहन चालक वर्ग ३ संघटना, जि.प.अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना, जि.प.अंशकालीन परिचर संघटना, जि.प.प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी संघटना, लिपिकवर्गीय संघटना, जिल्हा परिषदेतील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटनांसह 21 संवर्ग संघटनाचे सर्व पदाधिकारी व सदस्य संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे महसूल विभागातील महत्वाची कामे खोळंबली आहेत.