Saturday, April 19, 2025
HomeUncategorizedवाशिम 'समृद्धी' मार्गावर 44 दिवसात 65 अपघात ! 7 जणांचा बळी अन्...

वाशिम ‘समृद्धी’ मार्गावर 44 दिवसात 65 अपघात ! 7 जणांचा बळी अन् 67 जण जखमी

अकोला दिव्य न्यूज : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून एकट्या वाशीम जिल्ह्यामध्ये ४४ दिवसांत गंभीर स्वरूपाचे, छोटे, मोठे असे एकूण ६५ अपघात घडले. या अपघातांमध्ये सात जणांचा बळी गेला, तर ६७ जण जखमी झाले. सलग वाहन चालवण्यात आल्याने अनेक अपघातात मानवी दोष देखील समोर आले आहेत.

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करण्याचे उद्दिष्टे ठेऊन समृद्धी महामार्ग तयार झाला. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडतो. अत्याधुनिक पद्धतीने समृद्धी द्रुतगती महामार्ग तयार केल्या गेला आहे. नियमित घडणाऱ्या अपघातांमुळे मात्र या महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले. अपघातासाठी मानवी चुकांसह विविध कारणे समोर आली आहेत. यासाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या. मात्र, तरी देखील अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही.

नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळाला जाण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गाचा वापर केला. तर या काळात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवल्या गेली. त्यासोबतच अपघात देखील प्रचंड प्रमाणात वाढले. समृद्धी महामार्ग वाशीम जिल्ह्यातून जातो. वाशीम जिल्ह्यात गेल्या ४४ दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ६५ अपघात घडल्याचे समोर आले आहे.

त्या अपघातांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर ६७ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. १२ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या काळात प्राणांतिक व गंभीर दुखापतीचे पाच अपघात घडले. किरकोळ दुखापतीच्या २४ अपघातांमध्ये ४४ जण जखमी झाले आहेत. समृद्धीवर घडलेल्या विनादुखापत अपघातांची संख्या ३६ आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे निर्माण झाले. चालकाची डुलकी अन् अपघाताचा अनर्थ : समृद्धी महामार्गावरील प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो. त्यामुळे वाहन चालक देखील निर्धास्त राहतात. लवकर प्रवास पूर्ण करण्यासाठी चालक थांबा न घेता अनेक तास वाहन चालवत असतात. थकव्यामुळे चालकाला डुलकी लागून अपघाताचा अनर्थ घडतो. महाकुंभमेळासाठी गेलेल्या भाविकांचे व इतरही बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागल्यामुळेच घडल्याचे समोर आले. त्यामुळे समृद्धीवरून प्रवास करतांना चालकाने योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!