अकोला दिव्य न्युज ब्युरो : आदिवासी फासेपारधी समाजातील वंचित, दिनदुबळ्या तसेच गुन्हेगारीचा शिक्का लागलेले, विविध ठिकाणी भीक मागणारी व बालवयातच अनेक व्यसनानी ग्रासलेल्या बालकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ च. येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा या नावाने स्थापना करण्या आली.अनेक अडचणींवर मात करून ही शाळा मुलांच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, नैतिक व शारीरिक विकास घडविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथे प्रयत्न केले जात आहेत.त्याच अनुषंगाने विद्यार्थी शिक्षणाची कास धरून क्रीडा स्पर्धेत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून लक्षवेधी कामगिरी बजावत आहेत.
नुकत्याच आदिवासीं विकास विभाग,महाराष्ट्र शासन द्वारा अकोला येथे घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये दैदिप्यमान असे यश मिळवून थेट राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा करिता निवड झाली आहे.त्यामध्ये खो – खो,कबड्डी, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी,उंच उडी धावणे अश्या विविध खेळ प्रकारांमध्ये क्रीडा कौशल्य दाखवून थेट राज्य स्तरावर धडक मारली आहे.
वंचित,उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले, मुख्याध्यापक ओंकार पवार, माध्यमिक मुख्याध्यापिका नमिता भोसले व क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक अजय काळबांडे व नितेश वारुळकर तसेच सर्व शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.