अकोला दिव्य न्यूज : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली, परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. त्याप्रमाणे ३ मार्चला अकोला कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई दादर येथील टिळक भवन येथे संपन्न झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार शेतकऱ्यांचा विविध प्रश्न सोडवण्यासाठी सोमवार दिनांक ३ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला येथे अकोला ग्रामिण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शेतक-यांचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. महाराष्ट्रातील युती सरकारने शेतक-यांना कर्जमाफी सारखे अनेक आश्वासने दिलेली आहेत, मात्र त्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाकडून कोणतेही प्रयन सुरु नाहीत. तसेच शेतक-यांचे इतर अनेक प्रश्न असून त्याकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. या कारणास्तव शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सोमवार ३ मार्च, २०२५ पासून राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात शासनाने शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.

सदर धरणे आंदोलनास जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, जिल्ह्यातील आजी माजी आमदार, लोकसभा/विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, जिल्ह्यातील विविध आघाडी, विभाग व सेलचे पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व तालुका व शहराचे अध्यक्ष व तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनास जिल्ह्यातील शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केले आहे.