अकोला दिव्य न्यूज : मराठी भाषेचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून अकोल्यात साजरा करण्यात आला. मराठी भाषेला ‘अभिजात मराठी’ भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर अकोल्याच्या विदर्भ साहित्य संघ शाखा व अकोल्याच्या साहित्य, कला व संस्कृती संवर्धन चळवळीतील ‘अक्षरा-2’ या महिला समूहातर्फे ‘अभिजात मराठी’ या बहारदार कार्यक्रमाला सुजाण अकोलेकर रसिकांची दाद मिळाली.

अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात ‘अभिजात मराठी’ कार्यक्रमाची सुरुवात हस्ते दीपप्रज्वलन करुन कुसुमाग्रज यांना अभिवादन करून झाली. कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र गीताने होऊन मराठी भाषेच्या विविधांगी प्रवाहाच्या सादरीकरणात मायमराठीचे पत्र, मराठी भाषेच्या जन्माची कथा, महानुभाव वाङ् मय दर्शन, देवनागरीची कथा, जात्यावरच्या ओव्या, शिवरायांची आज्ञापत्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली मराठी भाषाशुध्दी याचा धावता व अभ्यासपूर्ण आढावा सादरीकरण झाले. यावेळी तबल्यावर सागर पारेकर यांनी साथसंगत दिली.
‘लाभले अम्हास भाग्य’ या मराठी भाषा गौरव दिन गीताने ‘अभिजात मराठी’ कार्यक्रमाचा कळसाध्याय साकारल्या गेला. कल्पना कोलारकर यांची मुख्य संकल्पना आणि शब्दांकन असलेला कार्यक्रम सादरीकरणात श्वेता चिमोटे, मनिषा नाईक, मेधा देशपांडे, गिरीजा कानडे, आकांक्षा देशमुख, अंजली अग्निहोत्री, प्रा.चंदा जयस्वाल, डॉ. वंदना मोरे, जयश्री पुणतांबेकर, मंजुषा सोनटक्के, मनिषा कुळकर्णी, मधुमती वऱ्हाडपांडे यांची मराठी महती सांगणारी गझल आदींचा सहभाग होता. प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. गजानन नारे यांनी केले. विदर्भ साहित्य संघ, शाखेच्या साहित्यविषयक उपक्रमांचा आढावा व भूमिका डॉ. गजानन नारे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ साहित्य संघ; शाखा अकोलाच्या कार्याध्यक्षा सीमा शेटे-रोठे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव प्रा.डॉ. सुहास उगले यांनी केले.

मराठी पुस्तकांची वर्षानुवर्ष विक्री, ग्रंथ प्रचार व प्रसार करणार्या अकोल्यातील निवडक अशा ग्रंथस्नेही रघुनंदन खंडेलवाल, पद्नाभ कारंजकर आणि मधूभाऊ यादव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विदर्भ साहित्य संघ शाखा अकोलाचे अध्यक्ष विजय कौसल आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ सदस्य तथा विदर्भ साहित्य संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.गजानन नारे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. तसेच वऱ्हाडी भाषेचे अभ्यासक आणि लेखक डॉ. रावसाहेब काळे यांचाही सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच ‘अभिजात मराठी’ कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण करणार्या ‘अक्षरा-2’ समूहातील कलावंतांचा सत्कार यावेळी विदर्भ साहित्य संघ अकोला शाखा कार्यकारिणी सदस्यांतर्फे करण्यात आला. कार्यक्रमाला बाजी वझे, डॉ.नानासाहेब चौधरी, अशोक ढेरे,सुरेश पाचकवडे, डॉ.गजानन मालोकर, डॉ.किरण वाघमारे, निलेश पाकदुणे, मोहिनी मोडक, डॉ.विनय दांदळे,डॉ.निशाली पंचगाम , अमोल गोंडचवर, नाट्यकर्मी रमेश थोरात, प्रा. मोहन खडसे , विनायक पांडे, प्रा.लता कराळे, श्रीकांत देशपांडे, राजू उखळकर यांचासह बहुसंख्येने सुजाण रसिक मंडळी उपस्थित होती.