अकोला दिव्य न्युज ब्युरो : दैनंदिन जीवनात विज्ञानाचा उपयोग वाढला आहे. विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धीने आपल्या आजूबाजूला, परिसरातील रोजच्या व्यवहारात विज्ञानाचा होणारा उपयोग जाणून घ्यावा, असे आवाहन प्रा. नितीन बाठे यांनी केले.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ स्थित श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या ‘द बैटल ऑफ ब्रेन’ आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्रा. नितीन बाठे बोलत होते.
तीन टप्प्यात झालेल्या या प्रश्नमंजुषेत शहरातील ७ शाळांच्या चमू सहभागी झाल्या होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण बाबींवर आधारित ही स्पर्धा होती. त्यात श्री समर्थ पब्लिक स्कूल अकोला, पोदार इंटरनॅशनल स्कूल अकोला आणि प्रभात किड्स स्कूलच्या चमूने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रमुख पाहुणे म्हणून नारायण घोडके व ईशान चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला श्री समर्थ शिक्षण समूहाच्या संचालिका प्रा.जयश्री बाठे, संचालक प्रा. किशोर कोरपे, प्रा.किशोर रत्नपारखी, व्यवस्थापन सदस्य प्रा.योगेश जोशी, प्राचार्य सुमित पांडे, उपप्राचार्य अश्विनी थानवी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन विज्ञान विभागप्रमुख सपना गुरबानी आणि सहकारी विज्ञान शिक्षकांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.