अकोला दिव्य न्यूज : USAID Funding freeze India: अमेरिकेकडून दिला भारताला जाणारा २ कोटी डॉलर्सचा निधी थांबवण्यात आला आहे. अमेरिकेच्या DOGE ने हा निर्णय घेतला असून, या निर्णयावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. निधी थांबण्याच्या निर्णयावर भाष्य करताना ट्रम्प यांनी DOGEच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील DOGEने १६ फेब्रुवारी रोजी जगभरातील विविध देशांना दिला जाणारा निधी थांबवण्यात येत असल्याची घोषणा केली. यात भारताला दिल्या जाणाऱ्या २ कोटी डॉलर्सचाही समावेश होता.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? हा निधी थांबवण्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. ते जगातील सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या देशामध्ये आहेत. त्यांचा व्यापार करही खूप जास्त आहे. मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा आदर करतो, पण मतदानांची टक्केवारी वाढावी म्हणून दोन कोटी डॉलर का द्यायचे?”, असा उलट सवाल ट्रम्प यांनी केला.

अमेरिका २ कोटी डॉलर्सचा निधी का द्यायची? भारतातील लोकांचा मतदानातील सहभाग वाढावा यासाठी अमेरिकेकडून हा निधी दिला जात होता. या निधीतून लोकांनी मतदान करावे यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम राबवले जात होते. तो निधी आता बंद करण्यात आला आहे.


१६ फेब्रुवारी रोजी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. DOGEने म्हटले होते की, अमेरिका भारतातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दोन कोटी डॉलर्सचा निधी द्यायची, तो आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
