गजानन सोमाणी •एडिटर इन चीफ: कधी कधी सामान्य वाटणारी माणसे अलौकीक तत्वज्ञान जगून जातात. त्यांच्या निधनानंतर त्या व्यक्तीची महत्ता लक्षात येते आणि निरलस भाव आठवणीत राहतो. प्रा.तुकाराम बिडकर हे असेच Unsung Hero होते. हा माणिक हयात असताना कुणाला ओळखता आला नाही. माणूस जातो, पण त्याचं कार्य शिल्लक राहतं. त्या कार्याचा प्रकाश पुढच्या पिढ्यांना दिशा दाखवत राहतो. प्रा. तुकाराम बिडकर हे असंच एक अजरामर नाव! त्यांनी शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याच भुमीशी आपली नाळ जुळवून ठेवली. स्वतःच्या अंत्यसंस्काराबाबत जे शब्द लिहिले, ते केवळ अंतिम इच्छा नव्हे, तर त्यांच्या जीवनदृष्टीचा आरसाच आहे. हे आता त्यांच्या निधनाने उघडकीस आले.

माजी आमदार बिडकर यांनी ‘माझं गाव, माझ्या आठवणी’ या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कार्यक्रमासाठी जय बजरंग विद्यालयाच्या प्रांगणात त्यांनी श्रमदानाने उभारलेल्या स्टेजवर त्यांचा पार्थिवदेह ठेवण्यात आला. तर बी.पी.एड कॉलेजच्या मैदानावर एका कोपऱ्यात माझ्यासाठी एक जागा ठेवा, खूप कष्ट करुन आणलं होतं हे कॉलेज मी, तिथेच मला जाळून टाका. माझा मुलगा पवनच्या हाताने अग्नी द्या. तद्नंतर कोणताही विधी करू नका असंही लिहीले आहे.त्याप्रमाणे महाविद्यालयाच्या मैदानावर मुलगा पवनच्या हाताने त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा संपूर्ण कुंभारी गावात स्मशान शांतता पसरली होती. अनेकांनी टाहो फोडू लागला, हुंदके आवरत नव्हते.
आपल्या आत्मचरित्रामध्ये प्रा.तुकाराम बिडकर यांनी लिहिले आहे की, माझी राख इतरत्र कोठे नेऊ नका. माझ्याच लोणार मायच्या उदरात टाकून द्या. अस्थी मात्र ‘ओंकारेश्वरला’ न्या. ओंकारेश्वर हे माझं अतिशय श्रद्धेचे अन् आवडतं ठिकाण आहे. मी दरवर्षी न चुकता श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी तिथेच जात असतो. त्या ठिकाणी नर्मदा मायच्या उदरात अस्थी विसर्जीत करा. माझ्या वडीलांच्याही अस्थी तिथेच विसर्जीत केल्या होत्या ना, तिथेच माझी अन् त्यांची भेटही होऊन जाईल. काही राख मात्र लोणार मायच्या पोटात टाकायच्या अगोदर शिल्लक ठेवजा. ती माझ्या जय बजरंग विद्यालयाच्या मैदानात, मुठभर फेकून द्या. मी त्या मातीत मिसळून जाईल. जेव्हा माझ्या शाळेचे, मंडळाचे खेळाडू माझ्या अंगखांद्यावर खेळतील तेव्हा मला किती आनंद होईल. मला तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं, जीवन सफल झाल्यासारखं वाटेल. या निमित्ताने मला गावातही राहता व सगळ्यांना पाहता येईल. ‘माझं गाव माझ्या आठवणी’ या पुस्तकात असल्याप्रमाणेच बिडकरपरिवारातर्फे सर्व सोपस्कार करण्यात आले.

मी राहीन… तुमच्या आठवणींमध्ये!
प्रा. तुकाराम बिडकर हे केवळ शिक्षक नव्हते, ते शिक्षणसंस्थांचे शिल्पकार होते. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यांनी घडवलेले विद्यार्थी, आणि त्यांची समाजशील विचारधारा – हेच त्यांच्या कार्याचं स्मारक आहे. त्यांचे शब्द, त्यांचे विचार, आणि त्यांनी घडवलेले शिक्षणाचे मंदिर – हेच त्यांचे खरे स्मारक आहे. म्हणूनच, ते म्हणतात, या निमित्ताने मला गावातही राहता येईल आणि सगळ्यांना पाहता येईल!
प्रा. बिडकर यांचा पिंड समाजसेवेचा होता.अपरिग्रह हे तत्वज्ञान त्यांनी सांगितले नाही तर ते जगले देखील ! उच्च विचार केवळ सांगण्यासाठी नव्हे तर ते विचार आचरणात आणणारा विरळा राजकारणी इहलोकातून निघून गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तुकाराम बिडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आज निघालेल्या अंतिम यात्रेत पालकमंत्री आकाश फुंडकर, समता परिषदेचे प्रमुख व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आ.वसंत खंडेलवाल, आ.हरिश पिंपळे, आ.मिटकरी, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, माजी आमदार वसंतराव खोटरे, संग्राम गावंडे सह सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते तसेच बिडकर यांचे मित्र, चाहते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.