अकोला दिव्य न्यूज : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर शिवरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेले बाळापूर तालुका मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष राजदत्त मानकर हेसुद्धा अपघातात ठार झाले.या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांना धक्का बसला आहे.शिवणी येथे घडलेल्या या घटनेनंतर इस्पितळात त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. आपल्या कर्तृत्वाने राज्यात आपली ओळख निर्माण करणारे तुकाराम बिडकर हे काही महिन्यांपूर्वी मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आले होते.पण काळाने अखेर आपला डाव साधला आणि एक हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. उद्या शुक्रवारी कुंभारी येथे त्यांचा पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिडकर हे मानकर यांच्यासोबत दुचाकीने शिवणी विमानतळावर गेले होते. भेट झाल्यानंतर परत येताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिवर येथील पेट्रोल पंपाजवळ जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) बिडकर यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ३० बीआर ९११०) जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर असलेले बिडकर व मानकर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य ते आमदार
प्रा. तुकाराम बिडकर हे उत्कृष्ट खेळाडू होते. कबड्डी या खेळात त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. जय बजरंग व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कुंभारीसह जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्था आहेत.
तोलंगाबाद येथे जन्मलेल्या प्रा. बिडकर यांनी राजकीय कारकीर्दीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतीसुद्धा होते. त्यानंतर २००४ मध्ये ते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून ते पवारांच्या सोबत होते. आमदार असतानाच त्यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता ते दिग्दर्शक
माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘डेबू’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर २०१४ मध्ये खैरलांजीच्या माथ्यावर, २०१७ मध्ये झरी, २०२२ मध्ये ‘तू फक्त हो म्हण’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली.
https://www.akoladivya.com/former-ncp-mla-tukaram-bidkar-dies-in-accident-at-akola