अकोला दिव्य न्यूज : स्पर्धात्मक युगातला सक्षम विद्यार्थी घडविण्याचं कार्य प्रभात किड्स स्कूलच्या माध्यमातून उत्तमरित्या होत असून त्यांच्या करिअर निवडीसाठी आवश्यक असा प्रभातने विकसित केलेला ‘करिअर ऑन व्हिल्स’ हा माहितीपूर्ण चित्ररथ विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांनी केले. ते वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूल येथे करिअर ऑन व्हिल्स या माहिती चित्ररथाचे आणि ट्रॅफिक पार्कचे उद्घाटन करताना बोलत होते.

या वेळी ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त प्रभात शाळेचा अभिमान वाटतो. प्रभात शैक्षणिक दृष्ट्या राबवित असलेले नावीन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राज्यभर राबविण्याचा मानस आहे व त्याचे यशस्वी उपयोजन व्हावे, यासाठी प्रभातमध्ये संस्थाचालक आणि शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावं, त्यासाठी आम्ही त्यांना आवश्यक सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. वसंत खंडेलवाल तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार अॅड. किरण सरनाईक, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सदस्य अशोक ढेरे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. पारंपरिक करिअर पेक्षा करिअरच्या आधुनिक युगाला योग्य अशा करिअरच्या व्यापक वाटा उपलब्ध आहेत. त्यांच्या जाणीव जागृतीसाठी करिअर ऑन व्हिल्स हा माहिती चित्ररथ आणि त्यातील बाबींचा तपशिल यावेळी डॉ. गजानन नारे यांनी दिला. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आमदार अॅड. किरण सरनाईक म्हणाले की, करिअर ऑन व्हिल्स या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आ. वसंत खंडेलवाल, आ. अॅड. किरण सरनाईक यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचित्र देऊन संचालक डॉ. गजानन नारे यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केले.
‘करिअर ऑन व्हिल्स’ या संदर्भात पारंपरिक ते अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यंतच्या करिअरचा आशय दर्शविणारी मोठी रांगोळी प्रभातच्या शिक्षिका रुपाली अंबुसकर यांनी काढली होती, ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
———————
प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी ‘शिक्षण व्यवस्थेमध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत’, ‘करिअर ऑन व्हिल्स, आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 माहिती, आशय व उपयोजन’ या तीन अहवालांचे सादरीकरण शिक्षणराज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांना केले. यावेळी तीनही उपयुक्त अहवालांचे शिक्षण राज्यमंत्र्यांनी कौतुक केले.