अकोला दिव्य न्यूज : दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच, तिकडे गुजरातमधून निवडणुकीशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यात एकूण 215 जागांवर भाजपला बिनविरोध विजय मिळा आहे. याच बरोबर भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला आहे. या जागांवर 16 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने भाजप आधीच विजयी झाला आहे.
भाजप बिनविरोध कसा जिंकला?
गुजरात राज्य निवडणूक बस आयोगाने जुनागढ महानगरपालिका, ६६ नगरपालिका, तीन तालुका पंचायती (कठलाल, कापडवंज आणि गांधीनगर) आणि काही इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी होती. या काळात भाजप उमेदवारांनी चार नगरपालिकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जागा जिंकल्या की, तेथील सर्व नगरपालिकाच भाजपच्या ताब्यात आल्या.
नगरपालिकांवर भाजपची बाजी –
भाजपने दिेलेल्या माहितीनुसार, पक्षाने हलोलमधील ३६ पैकी १९ जागा, भचौमधील २८ पैकी २२, जाफराबादमधील २८ पैकी १६, तर बांटवामधील २४ पैकी १५ जागा न लढवताच जिंकल्या आहेत. याशिवाय, इतरही काही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हलोलचे भाजप आमदार जयद्रथ सिंह परमार यांनी या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले क, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या धोरणांवर जनतेच्या विश्वासाची साक्ष देतो. जनतेने भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
पंचमहाल आणि वडोदरा येथेही भाजपचा विजय –
भाजपने पंचायत पातळीवरही बिनविरोध विजय मिळवला आहे. पंचमहल जिल्ह्यात शिवराजपूर जिल्हा पंचायत आणि सेहरा तालुका पंचायतीच्या मंगलिया जागेवर भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले. येथे काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते. काँग्रेस उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वडोदरा जिल्ह्यातील दशरथ-१ मतदारसंघातून भाजपचे सुनील गोपाल प्रजापती हे बिनविरोध विजयी झाले.
दरम्यान, गुजरातमधील जुनागढ महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे, जेथे निवडणुका होणार आहेत. येथे एकूण ६० जागांसाठी निवडणुका होत आहेत, यांपैकी भाजपने आधीच ९ जागा कोणत्याही विरोधाशिवाय जिंकल्या आहेत. या जागांवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आपले उमेदवार उतरवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, वलसाड महानगरपालिकेच्या वॉर्ड ८, ९ आणि १० मधील एकूण ७ जागांवर भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.