अकोला दिव्य न्यूज : कृषी क्षेत्राला भक्कम करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कृषी पदवीधरांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा पडाव म्हणजे दीक्षांत समारोह. आपल्या परिवारासोबतच समाज आणि देशाची सेवा करण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातील अनेकानेक क्षेत्रे पादाक्रांत करीत स्वत:ला सिद्ध करणाऱ्या भावी पिढीला आपल्या कर्तव्याची जाण उद्या बुधवार ५ फेब्रुवारीला डॉ होणार आहे. कृषी विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारोह महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व प्रतिकुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत आहे. या समारंभाला राज्याचे कृषी व उद्यान मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.ॲड. माणिकराव कोकाटे प्रमुख अतिथी म्हणून अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सारस्वतांच्या या सोहळ्यात भारतीय प्रशासन सेवेतील भूतपूर्व अधिकारी, कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई दीक्षांत भाषण करणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व अहवालवाचन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख करणार असून या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य, विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू सोबतच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विचारमंचावर उपस्थित राहतील.उद्या संपन्न होणाऱ्या या दीक्षांत समारंभात एकूण 3360 स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.
यामध्ये बी.एस्सी (कृषि) 1550, उद्यान विद्या 105, वन विद्या 22, कृषि जैव तंत्रज्ञान 44, कृषि व्यवसाय व्यवस्थापन 51, बी. टेक. अन्नशास्त्र 38, बी.टेक (कृषि अभियांत्रिकी) 147, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषि) 269, उद्यान विद्या 41, वनविद्या 12, कृषि अभियांत्रिकी 23, एम. बी. ए (कृषि) 24, एम. एस्सी कृषि जैव तंत्रज्ञान 09, पीएच.डी 21 आदीचा समावेश आहे. उपरोक्त 3360 स्नातकांपैकी दीक्षांत समारंभात 25 आचार्य पदविधारक, 378 स्नातकोत्तर, 2274 पदवीपूर्व पदवीकंक्षी स्वतः उपस्थित राहून पदवी स्वीकारतील व उर्वरित 687 स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थी संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर अप्रत्यक्षरीत्या पदवी स्वीकारतील.
यंदा एकूण 23 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, 13 रौप्य, 18 रोख बक्षिसे व पदके प्राप्त करीत इतर विद्यार्थ्याना प्रेरित केले आहे. तर 1 उत्कृष्ट शिक्षक, 10 उत्कृष्ट संशोधक, 2 उत्कृष्ट कर्मचारी व 1 उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश आहे. उद्या सकाळी 10 वाजता सुरु होणाऱ्या या समारोहाला निमंत्रित मान्यवर व पदवीकांक्षी विद्यार्थ्यांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी 9.30 वाजता दीक्षांत सभागृहात स्थानापन्न व्हावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे यांनी केले आहे.