अकोला दिव्य न्यूज : चार चाकी वाहनचालकांनी सिट बेल्ट आणि दुचाकी वाहनस्वाराने हेल्मेट वापरावे, यासाठी आज अचानक अकोला वाहतूक पोलीसांनी शहरातील चार ठिकाणी नाका बंदी करुन, सीट बेल्ट न लावलेल्या चारचाकी वाहनस्वाराला एक हजार तर हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकाला १ हजार रुपये दंड ठोठावला. सीटबेल्ट लावणे व हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे सांगितले जाते.मात्र कुठल्याही पुर्व सुचनेवीना ही जनजागृती मोहीम राबवताना आर्थिक दंड का ?
वाहनस्वार आणि चालकांनी कायदा वा नियमांचे पालन केले नाही तर कारवाई व्हावी, यात तिळमात्र शंका नाही.परंतु अलिकडच्या काही वर्षांपासून याबाबत पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष का केले गेले. वाहनचालकांना आणि पोलिसांना नियमांचे पालन करण्याचा सराव नसल्याने ही कारवाई केवो लाडक्या बहिणींमुळे रिकाम्या झालेल्या सरकारी खजिन्यात भर घालावी,यासाठी तर नाही ना ! चायनिज मांजाने अकोल्यात एका वाहनचालकाचा जीव गेला म्हणूनही कारवाई असल्याचा सूर असला तरी,अनेक वर्षांपासून नियमांचे पालन करण्याचा दंडक थंडबस्त्यात कोणी ठेवले.
आज मोहीम दरम्यान प्रत्येक वाहतूक पोलीस शिपायाला किमान १० वाहनचालकांवर कारवाई करण्याचे लक्ष्य दिले होते, असे सूत्रांनी सांगितले. सिटी कोतवाली येथे स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी या मोहिमेत जातीने हजर होते. वाहतूक विभागातील जवळपास ४० पोलिस शिपाई सहभागी असल्याचे दिसून आले. एका शिपाईला १० म्हणजे ४० जणांना मिळवून किमान ४०० वाहनचालकांना दंडात्मक कारवाई केली आणि यामाध्यमातून एका दिवसात अकोला शहरातून ४० हजार रुपये दंड वसूल करून सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे कालच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस.टी भाड्यात घसघशीत १५ टक्के वाढ केली.
राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी लाखो महिलांना लाडकी बहिण मानून कोट्यवधी रुपये वाटण्यात आले आणि सरकारी तिजोरीत खडखडाट झाला. आता सत्ताधारी झाल्याने काही काळ तरी लाभार्थी बहिणीला पैसे द्यावे लागणारच, तेव्हा विविध प्रकारच्या करवाढी आणि दरवाढीचा बोजा सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावर लादलं जाणार असून आजच्या कारवाईमुळे हेल्मेटची विक्री वाढेल आणि केंद्र सरकार सोबत राज्य सरकारला GST मधून कोट्यवधी रुपये मिळेल.